BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ नोव्हें, २०२२

पोलिसांच्या कारवाईमुळे ढाबेचालक धास्तावले, तळीराम गोंधळले !

 



शोध न्यूज : अवैध दारू विकणाऱ्या ढाबेचालकांची पोलिसांनी पळता भुई थोडी केली असून सोलापूर जिल्ह्यातील अनेक ढाब्यावर गुन्हे शाखेने छापे टाकले आणि मोठी कारवाई केली आहे. 


बहुतेक ढाबे हे अवैध मद्यविक्रीची केंद्र बनलेली असून अत्यंत खुलेआम दारूची विक्री होते आणि ग्राहक परवाना असल्याच्या थाटात ढाब्यावर मद्यप्राशन करीत बसलेले असतात. काही ढाबे तर यासाठीच प्रसिद्ध आहेत. सगळीकडे रस्त्यारस्त्यावर ढाबे थाटण्यात आले आहेत आणि येथे एकवेळ जेवण मिळणार नाही पण दारू कधीच कमीच पडणार नाही अशी परिस्थिती पाहायला मिळते. शासनाने परवाना दिलेल्या ठिकाणीच दारूची विक्री करता येते आणि परवाना असल्याशिवाय मद्य खरेदी देखील करता येत नाही असा नियम आहे पण हा नियम सगळीकडेच धाब्यावर बसवलेला असतो आणि ढाबे हे अशा अवैध मद्यविक्रीची प्रमुख ठिकाणे बनलेली असतात. यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असतो परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करताना दिसते. आता मात्र राज्यात सगळीकडेच मोहीम राबवली जात आहे. 


ढाब्यावर मद्यविक्री करताना तसेच तेथे बसून मद्यप्राशन करताना आढळल्यास आता थेट गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. गेल्या दोन महिन्यात अशा कारवाया वाढल्या असून अवैधरित्या मद्यविक्री करणारे ढाबेचालक आणि ग्राहक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाचे निकाल देखील तातडीने लागले आहेत. हॉटेल चालकास आणि ग्राहकास दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ढाब्यावर छापे पडू लागल्यामुळे ढाबेचालक धास्तावले आहेत तर ग्राहक देखील आता ढाब्यावर जाऊन मद्यप्राशन करण्यापूर्वी अनेकदा विचार करू लागला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे छापे पडू लागले आहेतच पण सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती न देता कारवाई सुरु केल्याचे हॉटेलचालक गोत्यात येताना दिसत आहेत. 


सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल मंगळवेढा, मोहोळ आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा ढाब्यांवर कारवाई केली आणि हॉटेल चालकांची पळता भुई थोडी करून टाकली आहे. मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव परिसरातील ढाब्यावर छापा टाकून आंधळगाव येथील सलीम रमजान इनामदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच येथून ७ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.  मोहोळ तालुक्यातील हिवरे पाटीजवळ देखील अशी कारवाई करण्यात आली असून तेथून सहा हजार साठ रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. वडजी तांडा येथील कारवाईत सदाशिव दादू सावंत याला पोलिसांनी पकडले तर कैलास हुन्नाप्पा पवार हा पोलीस पहातच पळून गेला आहे. त्याचाविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.     


राज्य उत्पादन शुल्क विभागाने मनावर घेवून या कारवाया सुरु केल्या असून ढाबाचालक गोत्यात येताना दिसत आहेत. कारवाया सुरु असल्या तरी अनेक ढाबे अजूनही अवैध दारू चोरट्या मार्गाने विक्री करीत असल्याचे दिसत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत अवैध मद्य तसेच विनापरवाना मद्यप्राशन करीत असलेले तळीराम सापडतात परंतु स्थानिक पोलिसांना मात्र या कुठल्याच अवैध गोष्टी आढळून येत नाही याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. (Sale of illegal liquor at the hotel, Solapur police action) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांना माहिती न देता हे छापे टाकले असून त्यांना मुद्देमाल आढळून आला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांचे इन्स्पेक्शन पोलीस महासंचालक कार्यालयाकडून होताच गुन्हे शाखेने या धाडी टाकणे सुरु केले आहे. 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !