शोध न्यूज : बेकायदेशीर भिशी चालविणारा 'सावकार' दोन कोटींचा चुना लावून पसार झाल्याने शेकडो लोकांची फसवणूक झाली असल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गल्लीबोळात आणि वाड्यावस्त्यांवर बेकायदेशीर भिशी सुरु असते आणि अनेक लोक यात सहभागी असतात. सामान्य आणि मध्यमवर्गीय लोक भिशीत सहभागी होत असतात आणि रक्कम गुंतवत असतात. एकमुठीने काही रक्कम हाती येईल आणि मोठी गरज भागवता येईल या अपेक्षेने दर महिन्याला रक्कम गुंतवली जाते आणि नंबर आला की मोठी रक्कम हाती येते. यामुळे अनेकजण या बेकायदेशीर भिशी प्रकारात सहभागी होतात. काही वेळा या सामान्य लोकांची मोठी फसवणूक देखील होत असते. सोलापुरात तर भलताच मोठा प्रकार उघडकीस आला असून २७६ लोकांची यात आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा चुना लावून सावकारच बेपत्ता झाला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आता याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर येथील महादेव चंद्रकांत तुम्मा यांनी या फसवणुकीबाबत जेल रोड पोलिसात फिर्याद दिली असून यात २७६ लोकांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे. फसवणूक झालेल्या लोकांच्या यादीसह आणि रकमेसह त्यांनी ही फिर्याद दिली आहे. अशोक कैरमकोंडा हे भिशी चालवत होते आणि त्यांच्याकडे आपण तसेच अन्य लोक आठवड्याला, महिन्याला रक्कम जमा करीत होतो. बेकायदेशीर भिशी चालवून एक टक्का रक्कम वाढीव देण्याच्या आमिषावर आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चाळीस वर्षापासून ते भिशी चालवत होते परंतु कोरानाच्या काळात आलेल्या अडचणीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आणि अशोक कैरमकोंडा हे लोकांची रक्कम न देताच बेपत्ता झाले आहेत. दरमहा थोडी थोडी रक्कम गुंतवली परंतु हे पैसे परत न देताच ते बेपत्ता झाले असल्याने अनेक लोकांची मोठी फसवणूक झाली आहे..
आपला आणि अन्य सभासदांचा विश्वास संपादन करून तसेच एक टक्का जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झाली असल्याचे तुम्मा यांनी म्हटले आहे. २०१९ पासून २०२२ पर्यंत नियमितपणे रक्कम जमा करण्यात आली परंतु आपली आणि अन्य सभासदांची एकूण १ कोटी ७९ लाख ९४ हजार १०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अशा प्रकारे फसवणूक झालेले २७६ लोक समोर आले असून त्यांची नावासह आणि फसवणूक झालेल्या रकमेसह यादी पोलिसांना देण्यात आली आहे. यातील ४१ लोकांची एक ते पाच लाखापर्यंतची रक्कम आहे. अशोक कैरमकोंडा हे घरातून बेपत्ता झाल्याचे समजताच या लोकात प्रचंड खळबळ उडाली आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे. साखर पेठेत राहणारे अशोक रामाय्या कैरमकोंडा, अरविंद अशोक कैरमकोंडा व सुजाता अरविंद कैरमकोंडा या तिघांनी संगनमताने आपली फसवणूक केली असल्याचे तुम्मा यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जेल रोड पोलिसांनी सदर तिघांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूक झालेले २७६ लोक आत्तापर्यंत समोर आलेले असून आणखी काही लोकांची अशाच प्रकारे फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. बेकायेशीर भिशी चालवणारे अशोक कैरमकोंडा हे घरातून ५ नोव्हेंबर रोजीच बेपत्ता झाले आहेत परंतु याची माहिती जेंव्हा मिळाली तेंव्हा फसवणूक झालेले लोक धास्तावले. (Cheating of crores, moneylender absconding, crime against three)आपली मोठी रक्कम बुडत असल्याचे दिसल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
ते बेपत्ता झाले आणि ---
बेकायदेशीर भिशी चालवणारे अशोक कैरमकोंडा हे बेपत्ता झाले पण याची कुणालाच माहिती नव्हती. त्यांची सून सुजाता यांनी वकिलाच्या माध्यमातून एक नोटीस दिली आणि अशोक कैरमकोंडा यांच्या व्यवहाराशी आमचा काही संबंध नाही असे त्यांनी या नोटिशीत म्हटले. ही नोटीस पाहून रक्कम गुंतवलेले लोक भीतीने त्यांच्या घरी पोहोचले तेंव्हा एकूण प्रकार समजला. अशोक कैरमकोंडा यांच्या बँक खात्यात तीस लाख रुपये असून हे खाते सील करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !