शोध न्यूज : महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्याचा पाच एकर ऊस जळून खाक झाला आणि ही आग विझविण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याचे हात भाजले !
जीवाचे रान करून शेतकरी ऊसाचे पिक जोपासतो, वाढवतो आणि महावितरण या ऊसाची राखरांगोळी करतो असे विदारक चित्र पुन्हा पुन्हा दिसत असते. बळीराजा हा सतत कुठल्या न कुठल्या संकटांचा सामना करीत असतो. ऊसाचे पिक पूर्णत्वास आणण्यासाठी प्रचंड अडचणीतून धडपडत असतो. खते, औषधे, मजूर अशा विविध समस्यातून शेतकरी ऊसाची जोपासना करतो परंतु तो साखर कारखान्याला पोहोचण्याच्या आधीच त्याच्या स्वप्नांची राख होताना त्याला पाहावे लागते. वीज नसल्याने पिके जळतात आणि विजेच्या भोंगळ कारभाराने पिकांनाच आग लागते. शेतात उभा असलेला ऊस जळण्याच्या घटना सगळीकडे आणि सतत घडत असतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील हरीनगर - बेंबळे येथील शिवारात पुन्हा एकदा महावितरणच्या बेपर्वाईमुळे पाच एकर उसाची राख झाली आहे.
विजेच्या तारांचे घर्षण होत पडलेल्या ठिणग्यामुळे उभ्या उसाला आग लागली आणि पाहता पाहता ही आग संपर्ण उसात भडकली. पाच एकरातील ऊस पेटला आणि डोळ्यादेखत आगीच्या ज्वाळात लपेटला गेला. सोमनाथ रामचंद्र आटकळे यांनी मोठ्या कष्टाने जोपासलेला पाच एकर उसाचा फड डोळ्यादेखत जळून गेला. या आगीत सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. आटकळे यांच्या शेतात सोळा वर्षापूर्वीचे विजेचे खांब आणि तारा आहेत. वेळोवेळी लक्ष न दिल्यामुळे या तारा सैल होऊन लोंबकळत आहेत. गेल्या चार वर्षात या लोंबकळत असलेल्या तारा धोकादायक स्थितीत आहेत. वारा सुटला किंवा पक्षी बसले तरी देखील या तारांचा परस्परांना स्पर्श होतो आणि त्यांचा घर्षणातून ठिणग्या पडत असतात. या तारांचे असेच घर्षण झाले आणि त्यातून पडलेल्या ठिणग्यामुळे ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
ऊसाला आग लागल्याचे दिसताच दहा पंधरा तरुणांनी चारी बाजूनी प्रयत्न करून ही आग विझविण्यासाठी धडपड केली, काही प्रमाणात आग आटोक्यात देखील आणली गेली परंतु व्हायचे ते नुकसान टाळता आले नाही. आग लागली तेंव्हा थोडीशी हवा देखील वाहात होती त्यामुळे लागलेली आग अधिकच भडकत गेली आणि ती उसात पसरली गेली. (Five acres of sugarcane caught fire due to Mahavitaran) झालेले नुकसान शासनाने भरून द्यावे आणि महावितरणच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता शेतकरी सोमनाथ आटकळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !