शोध न्यूज : सोलापूर शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांनी एका वयोवृद्ध व्यक्तीला फायबरच्या काठीने मारहाण केल्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
डॉक्टर हे परमेश्वराचे रूप मानले जाते आणि रुग्णालय हे एक मंदिर मानले जाते. मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्याचे काम डॉक्टर करतात. अशा डॉक्टरांच्या हातात काठी असणे आणि त्यांच्याकडून कुणाला बेदम मारहाण होणे अशा घटना अपेक्षितही नसतात आणि तशा त्या घडताना दिसतही नाहीत. सोलापूर येथे मात्र अत्यंत सामान्य आणि किरकोळ कारणावरून डॉक्टरांनी स्वत: एक वयस्कर व्यक्तीला बेदम मारहाण केली असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यामुळे वैद्यकीय विश्वात देखील खळबळ उडाली आहे आणि या घटनेची मोठी चर्चा देखील सुरु झाली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीने सदर बजार पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसात संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूर येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ असलेल्या डॉ. संदीप आडके यांच्या विरोधात विजय चौधरी या गवंडी कामगार व्यक्तीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय चौधरी हे गवंडी कामगार रस्त्यावरून जात असताना रुग्णालयातून कुणीतरी खरकटे पाणी फेकले. हे पाणी विजय चौधरी यांच्या अंगावर पडले त्यामुळे चौधरी हे रुग्णालयात गेले आणि त्यांनी याबाबत जाब विचारला. डॉक्टर आडके यांनी मात्र संतापून विजय चौधरी यांनाच फायबरच्या काठीने बेदम मारहाण केली. काही लोकांच्या साक्षीने ही मारहाण झाली असून लोक मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले परंतु डॉक्टरांनी या व्यक्तीला काठीने झोडपून काढले. यात विजय चौधरी यांना मोठा मार देखील लागला आहे.
विजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. आडके यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ नुसार डॉक्टर आडके यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर डॉ. आडके यांनी देखील विजय चौधरी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विजय चौधरी यांनी दारू पिऊन रुग्णालयात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टर आडके यांनी केला आहे. सदर बाजार पोलीस आता या घटनेचा तपास करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज समोर !
सदर मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून यात सदर व्यक्तीला होत असलेली बेदम मारहाण स्पष्ट दिसत आहे. (Elderly man beaten by doctor with fiber stick) हातात काठी घेवून विजय चौधरी यांना मारहाण होत असून काही लोक चौधरी यांना सोडविण्यासाठी पुढे येत आहेत. अत्यंत संतापून ही मारहाण केली जात असल्याचे देखील या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. पोलिसांच्या तपासासाठी हे फुटेज महत्वाचे ठरणार आहे.
मारहाणीचा व्हिडीओ


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !