शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील भीमा साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असतानाच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना त्यांचे विधान अडचणीत आणण्याची शक्यता निर्माण झाली असून महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात परस्परांवर टीका करण्याच्या हलग्या जोरदार कडाडल्या असून रविवारी मतदानाचा दिवस आहे. प्रचंड चुरस आणि परस्पर आरोपांच्या तोफा धडाडल्यानंतर आता मतदानाचा दिवस आला आहे. दरम्यान प्रचार अखेरच्या टप्यात असताना भीमा बचाव आघाडीचे पॅनलप्रमुख आणि राष्टवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या एका वक्तव्याने वाद आणि नाराजी निर्माण होताना दिसत आहे. माजी आमदार पाटील यांच्या बिनधास्त विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर काहींना हे प्रचंड अपमानास्पद वाटून गेले असल्याचे दिसत आहे, विशेषतः महिला वर्ग ऐन मतदानाच्या वातावरणात नाराज झाल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे. दरम्यान माजी आमदार पाटील यांच्या विधानावर महिला आयोगात तक्रार करण्याचा हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात असून देखील करण्यात येऊ लागल्याची माहिती आहे.
प्रचाराच्या अखेरच्या सभेत शुक्रवारी माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. राजकारणात हल्ली जीभ घसरण्याची प्रकार गल्ली ते दिल्ली होताना दिसत आहेत परंतु ऐन निवडणुकीच्या काळात एखादे विधान भलतेच महागात पडण्याची शक्यता असते. .‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच एवढी बाळं असतात, याचा आम्हाला स्वाभिमान आहे’ अशा प्रकाराचे विधान माजी आमदार राजन पाटील यांनी केलेच शिवाय त्यांनी ‘आमच्या पोरांना भिती दाखवता का ? वयाच्या सतराव्या वर्षी ३०२ कलम भोगणारी आमची पोरं हायती’ असे विधान देखील त्यांनी जाहीरपणे बोलताना केले. (Bhima Sugar Factory Election, Controversial Statement) त्यामुळे त्यांनी एक प्रकारे मुलाच्या गुन्हेगारीचे समर्थनच केले असल्याची टीका होऊ लागली आहे.
'भीमा' च्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक यांच्या गटापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्यात अशा प्रकारचे विधान हे अडचणी निर्माण करणार असल्याचे बोलले जाऊ लागलेलं आहे. त्यांच्या या विधानामुळे महाडिक विरोधी असलेल्या गटाची मोठी पंचाईत झालेली असल्याचे मानले जाऊ लागले आहे. विरोधकांनी या वक्तव्याचा समाचार घ्यायला लगेच सुरुवात केली आणि हा महिलांचा अपमान असल्याचे म्हटले जाऊ लागले आहे. याशिवाय मुलाच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण असल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे. सोलापूर जिल्हयाच्या बाहेर देखील या विधानांचे पडसाद उमटू लागले असून पाटील गटाला खिंडीत पकडणे सुरु झाले आहे.
भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याची ताजी बातमी समोर आली आहे !
‘लग्नाअधीच पोरं आहेत, असे म्हणणार्या आणि तमाम महिलांचा अपमान होर्ईल, महाराष्ट्रातील समस्त पाटील मंडळींची बदनामी होईल असे हे वक्तव्य असून पोरांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा अभिमान आहे, (Ex-MLA Rajan Patil is likely to get into trouble with his controversial statement) अशी बेताल वक्तव्य करणार्या विकृत माणसाच्या हाती भीमा कारखान्याची सत्ता सोपविणार का? असा सवाल उपस्थित करीत या वक्तव्याला रंग देण्याचा जोरदार प्रयत्न झाला आहे त्यामुळे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील हे विधान माजी आमदार राजन पाटील याना अडचणीत आणणार काय ? याकडेच आता मोहोळ तालुका नव्हे तर सोलापूर जिल्हयाचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !