BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० नोव्हें, २०२२

पोहायला गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू !

 


शोध न्यूज : बंधाऱ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाचा बुडून मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेने सांगोला तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. 


यावर्षी राज्यात सर्वत्र मुबलक पाऊस झाला असून नद्या, नाले, धरणे, बंधारे तुडुंब भरले आहेत. यावर्षी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनाही वाढलेल्या आहेत. सांगोला तालुक्यात एका दुर्दैवी घटनेत बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना घडली असून या घटनेने तालुक्यात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. सांगोला तालुक्यातील नाझरे येथील स्वप्नील राजेंद्र रणदिवे हा १८ वर्षे वयाचा तरुण माण नदीवरील बंधाऱ्यात पोहोण्यासाठी गेला आणि तेथेच ही दुर्दैवी घटना घडली. नाझरे येथील श्री दत्त मंदिर परिसरात बंधाऱ्यात बुडून स्वप्नीलचा अंत झाला आहे. 


नाझरे विद्यामंदिर प्रशालेत बारावी इयत्तेत शिकणारा स्वप्नील हा आपल्या काही मित्रासमवेत बंधाऱ्यात पोहोण्यासाठी गेला होता. मित्रासोबत पोहून झाल्यावर दुचाकीवरून आपल्या घराकडे निघाला होता. घराकडे जाताना अचानक त्याचा विचार बदलला आणि तो पुन्हा बंधाऱ्यावर गेला. तेथे गेल्यावर त्याचा पाय घसरला आणि तो तो खाली पडला. काही क्षणात तो पाण्यात बुडाला. स्वप्नीलच्या मित्रांनी ही माहिती स्वप्नीलचा भाऊ सुरज याला दिली तसेच बंधाऱ्याच्या पाण्यात त्याचा शोध सुरु केला. बंधाऱ्यात खोलवर पाणी असल्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. 


अनेकांनी पाण्यात उतरून स्वप्नीलला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडत नव्हता. तहसीलदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर आणि सांगली येथून रेस्क्यू पथकांना पाचारण केले आणि सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. स्वप्नील याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (College student drowns while going swimming) स्वप्नीलचा मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश सुरु केला तर परिसरातील नागरिकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !