BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ नोव्हें, २०२२

ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली तर खैर नाही !

 


शोध न्यूज : उसाची वाहतूक ट्रॅक्टरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवली तर  कारवाई करण्याचा इशारा आता पोलिसांनी दिला आहे. अशा ट्रॅक्टरचालकावर थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. 


साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झाला की मृत्यूचा देखील हंगाम सुरु होतो. ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमुळे राज्यभर सगळीकडेच अनेक अपघात होतात. ऊस वाहतुकीच्या वाहनांमुळे होणाऱ्या अपघातात गळीत हंगामात बेसुमार वाढ होते आणि या अपघातात मृत्यूंची संख्याही मोठी असते. अत्यंत कर्णकर्कश आवाजात गाणी लावली जातात तसेच मागच्या बाजूला रिफ्लेक्टर नसताना ही वाहने कुठेही कशीही उभी केली जातात. रात्रीच्या वेळेस तर ही उभी वाहने दिसून येत नाहीत आणि पाठीमागून येणारे वाहन सरळ ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकते आणि यात नाहक निरपराध लोकांचे  जीव जात असतात. दरवर्षी गळीत हंगामाच्या काळात अशा घटना घडतात . गळीत हंगाम सुरू होऊन अवघे काही दिवस झाले आहेत परंतु या दिवसात देखील अनेक अपघात होऊन प्राण गेलेले आहेत. अशा वाहनावर नियंत्रण असावे अशी मागणी नेहमीच होत असते परंतु ठोस कारवाई होताना कधीच दिसत नाही. 


आता मात्र मंगळवेढा पोलिसांनी याबाबत थेट इशारा दिला असून मोठ्या आवाजात गाणी वाजविण्याऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गाळप हंगाम सुरु झाल्यापासून उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची गर्दी रस्त्यारस्त्यावर वाढलेली आहे. वाहतूक सुरक्षा विचारात घेता ट्रॅक्टर, बैलगाडी या वाहनांच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे, अत्यंत मोठ्या आवाजांत गाणी लावून ट्रॅक्टर ऊसाची वाहतूक करीत असतात परंतु आता अशा ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येथील असा इशारा मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी दिला आहे. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर वाहनावर रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव हा इशारा देण्यात आला आहे. 


ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मागच्या बाजूला रिफ्लेक्टर नसल्याने तसेच समोरून येत असलेल्या वाहनांच्या प्रकाशात पाठीमागून येत असलेल्या वाहनांना अंधारात काही दिसू शकत नाही. अशावेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. उसाची वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डरवर गाणी लावत असतात त्यामुळे मागून येत असलेल्या वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक असते, (Police action if loud songs are played on tractors) म्हणून यापुढे अशा प्रकारे मोठ्या आवाजात गाणी लावलेली आढळल्यास चालकावर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा देण्यात आला. 


तिघांचा मृत्यू !

दौंड - पाटस अष्टविनायक मार्गावर रात्री दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीच्या धडकेत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून एका दुचाकीने जोराची धडक दिली आणि या धडकेत तिघे जागीच ठार झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. ट्रॉलीच्या मागच्या बाजूला रिफ्लेक्टर लावलेले नव्हते आणि रात्रीच्या वेळेस दुचाकी चालकाच्या लक्षात आले नाही त्यामुळे दुचाकी सरळ जाऊन  उसाच्या ट्रॉलीवर आदळली आणि दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. केवळ रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा अपघात झाला असून चालकाच्या चुकीमुळे तिघांचे बळी गेले आहेत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !