BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ नोव्हें, २०२२

ऊस दर आंदोलनाचा भडका, राजू शेट्टी यांचा मोठा इशारा !


शोध न्यूज :ऊस दराचे आंदोलन भडकत असतानाच आज दुपारपर्यंत शासनाने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. आंदोलन आता हिंसक मार्गावर जाण्याचे संकेत देखील मिळू लागले आहेत. 


गळीत हंगाम सुरु झाल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मागण्या मांडत आहेत पण शासन आणि साखर कारखाने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. ऊस दरासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मागण्या प्रलंबित असतानाच गाळप हंगाम सुरु झाला पण त्यानंतर शेतकरी संघटना आक्रमक होत गेल्या आहेत. सुरुवातीला वाहतूकदारांना होत जोडून वाहतूक थांबविण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर मात्र ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडणे, टायर फोडणे असे प्रकार घडू लागले. सांगली भागात तर ट्रॅक्टर पेटवून देण्यात आले आहेत. आता तर थेट अल्टिमेटम देण्यात आला असून आज दुपारपर्यंत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. 


मागील हंगामातील वाढीव दोनशे रुपये साखर कारखानदारांनी दिले नाहीत शिवाय राज्य शासनाने एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय यावर्षीच्या हंगामात घेतला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली असून १७ आणि १८ नोव्हेंबर अशा दोन दिवसांसाठी ऊसाची तोड बंद ठेवण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते आणि त्यानुसार या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  राज्य सरकारने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करू आणि त्यानंतर काय करायचे ते मी सांगतो' असे शेट्टी यांनी काल स्पष्टच सांगितले आहे. आज दुपारपर्यंत कोणताही निर्णय नाही घेतला गेला तर या आंदोलनाचा भडका उडेल असा स्पष्ट आणि रोखठोक इशारा शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी  दिला आहे, त्यामुळे हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. 


शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा असून आज दुपारी दोन वाजेपर्यंत प्रतिक्षा केली जाणार आहे. आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली असून दुपारपर्यंत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा करून दुपारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदार यांनी उसाची तोड पूर्णपणे बंद ठेवून सहकार्य केल्याबद्धल शेट्टी यांनी आभार मानले आहेत शिवाय या आंदोलनाला साथ देण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय सोडणार नाही, गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदोलने करीत आलो परंतु एवढा असंवेदनशिलपणा आजवर एकही मुख्यमंत्री अथवा मंत्रिमंडळाने दाखवला नव्हता. हिंसक आंदोलन केल्यावरच सरकार लक्ष देणार आहे काय ? असा सवाल देखील शेट्टी यांनी उपस्थित करून पुढील आंदोलनाच्या तीव्रतेचे संकेतच त्यांनी दिले आहेत.

 

गेल्या महिन्यापासून ऊस उत्पादकांचे आंदोलन सुरु आहे परंतु शासन पातळीवरून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली नाही, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे परंतु दखल घेतली गेली नसल्याने आणि आज पुढील निर्णय होणार असल्याने हे शेतकरी आंदोलन हिंसक बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. (The next direction of sugarcane price movement will be today)आज दुपारच्या बैठकीत शेतकरी संघटना काय निर्णय घेतेय याकडे आता तमाम शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !