BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑक्टो, २०२२

घाट उतारावर झालेल्या अपघातात वीस वारकरी जखमी !


शोध न्यूज : पंढरपूरहून दर्शन घेवून पुढे गेलेल्या भाविकांच्या वाहनास झालेल्या अपघातात तब्बल २० वारकरी जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे.


गेल्या काही काळात भाविकांच्या वाहनांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे, पंढरीच्या वारीला येताना आणि जाताना भाविकांच्या खाजगी वाहनांना मोठे अपघात होत असून यात काही भाविकांचा मृत्यू देखील होत आहे. अनेक वारकरी मिळून खाजगी वाहन भाड्याने करून देवदर्शन करीत फिरत असतात. पुढे पुढे जाण्याच्या आणि कमी दिवसात अधिक तीर्थक्षेत्र उरकण्याच्या घाईगर्दीत चालकाला विश्रांती मिळालेली नसते, खाजगी वाहनांची देखभाल दुरुस्तीही व्यवस्थित केलेली नसते. याचा परिणाम अपघातात होऊन भाविकांचे प्राण संकटात येत असतात. आता पुन्हा अशाच एका खाजगी वाहनाला अपघात होऊन भाविक जखमी होण्याची घटना घडली आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील भाविक एक खाजगी पिकअप वाहन घेवून विविध ठिकाणच्या देवदर्शनासाठी निघाले होते. हे वाहन घेवून भाविक पंढरपूर येथे पोहोचले. पंढरपूर येथे दर्शन घेवून ते पुढे जेज्रुरी येथे दर्शनासाठी गेले. तेथून ते पुढे निघाले असताना शिंदवणे घाटात एका तीव्र उतारावर त्यांचे पिकअप वाहन उलटले. जेजुरी येथून हे भाविक आळंदी येथे दर्शनासाठी निघाले होते परंतु वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यात वीस वारकरी जखमी झाले. यात तिघांची प्रकृती गंभीर आहे.  वैजापूर तालुक्यातील धामणगाव येथील  मच्छिंद्र माधवराव दाभाडे (वय ६६) शामराव आसाराम देवकाते (वय ६८), भाऊसाहेब उमाजी साबळे (वय-६५) या तीन वारकऱ्यांना या अपघातात मोठा मार लागला आहे. शिवाय हे तिघेही जेष्ठ नागरिक आहेत. 


अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपकारासाठी दाखल करण्यात आले आहे.  शिंदवणे घाटातील तीव्र उतारावर हा अपघात झाला असून वाहन उतारावरून निघाले असताना गाडीला ब्रेक लागला नसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Warkari injured after pickup overturns in ghat) तीव्र उतार आणि ब्रेक न लागण्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात झाला आहे.  






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !