शोध न्यूज : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून त्यामुळे दूधात भेसळ करण्याच्या प्रवृत्तीला आपोआप लगाम लागणार आहे.
दूध आणि पाणी यांचे नाते खूप जवळचे आणि दुधापेक्षा अधिक घट्ट असते हे सर्वांनाच माहित आहे. बिगर पाण्याचे दूध मिळणे हे एक दिव्य होऊन बसले असून बिगर पाण्याचे दूध मागितले तर चक्क जादा दर मागितला जातो आणि दूध नावाचे पाणी विकले जात असल्याचे अप्रत्यक्षपणे कबूल केले जाते. घरोघरी वितरीत केले जात असलेले दूध हे 'पाणी'दार असते यात कुणालाच शंका उरली नाही की असे दूध विकण्यात कुणाला शरम वाटण्याचा विषय उरला नाही. त्यामुळे दुध म्हटले की पाणी असणारच असे आता गृहीत धरले जात आहे आणि दूध नावाचे पांढरे पाणी सर्रास विकले आणि घेतले जात आहे. जिल्हा दूध संघात देखील अशा प्रकारे भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या बैठकीत सभासदांनीच दुधातील भेसळीबाबत गंभीर तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी सभासदांना आश्वस्थ केले होते आणि भेसळ रोखण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसविली जाणार असल्याचे सांगितले होते. या यंत्रणेमुळे आपोआप दूध भेसळीवर नियंत्रण येते. मानवाचा कसलाही हस्तक्षेप होत नाही. बैठकीत दूध संकलनात वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले होते तेंव्हा काही सभासदांनी भेसळीचे दुध संघाला देत असल्याचा आरोप संचालकांवरच केला होता. त्यावर संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल असे सांगितले होते.
जिल्हा दूध संघाच्या सर्वच संकलन केंद्रावर आता अशी अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून सीसीटीव्ही यंत्रणाही सज्ज केली आहे. यामुळे दूध पंढरीत दर्जेदार दुधाचे संकलन होणार असून गैरप्रकारावर आपोआप आला बसणार आहे. सगळ्याच सावळ्या गोंधळाला आता चाप लागणर आहे. जिल्ह्यातील सर्वच संकलन केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात सुरुवात देखील झाली आहे. सभासदांनी केलेल्या तक्रारीत केगाव संकलन केंद्राकडे विशेष बोट दाखविले गेले होते, तेथेही ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
केगावसह टेंभुर्णी, मंगळवेढा, सांगोला, करमाळा येथील संकलन केंद्रात ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून मोहोळ आणि पंढरपूर येथेही ही यंत्रणा बसविण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाच्या केगाव संकलन केंद्रावर अद्ययावत दूध तपासणी प्रणाली बसविण्यात आली असून कमी गुणवत्तेचे दूध घालणाऱ्या संस्थाना आता आपोआप चाप बसणार आहे. (Curb on milk adulteration in Solapur district) पर्यायाने संकलित होणार्या दुधाची प्रत सुधारली जाणार असल्याची माहिती दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
कर्मचारी निलंबित !
केगाव दुध संकलन केंद्रात गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून तेथे पदासाठी पात्र तपासणीस नेमले गेले आहेत. कर्मचारी निलंबनाबाबत मागील बैठकीत अध्यक्ष शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिलेले होते त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. आता केगाव दूध संकलन केंद्रावर नव्याने अर्हताप्राप्त महिला तपासनीस नेमण्यात आल्या आहेत. काही वर्षांपासून ठराविक मंडळीनी कमी प्रतीचे दुध संघाला घालून लाखो रुपयांची मलाई खाण्याचे काम केले आहे त्यामुळे संघ अडचणीत येत राहिला आहे. आता मात्र हा प्रकार आपोआप बंद होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !