BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑक्टो, २०२२

टोळीची भीती ! धावत्या जीपमधून तीन मुलीनी मारल्या उड्या !

 



शोध न्यूज : मुले पळविणाऱ्या टोळीची दहशत काही केल्या थांबायला तयार नसून धावत्या जीपमधून तीन मुलीनी उड्या मारल्या असून यामुळे त्या जखमीही झाल्या आहेत.


मुले पळविणाऱ्या कथित टोळीची राज्यभर दहशत निर्माण झालेली असून  ठिकठिकाणी पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे, तरीदेखील लोकांच्या मनातील भीती कमी व्हायला तयार नाही आणि यामुळे राज्याच्या विविध भागात अनेक घटना घडताना दिसत आहेत. केवळ संशयावरून अनोळखी व्यक्तीला मारहाण केली जात आहे तरी बुरखाधारी महिला दिसली की मुले पळविणाऱ्या टोळीतील महिला समजून तिला त्रास दिला जात आहे. बुरखा घालून प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणांची देखील जोरदार धुलाई झाली आहे. अनोळखी व्यक्ती दिसताच मुले पळविणारी समजून बेदम मारहाण केली जात असल्याने अनोळखी ठिकाणी फिरणे देखील कठीण आणि धोक्याचे ठरू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात या नसलेल्या टोळीची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यातूनच परभणी जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळीची केवळ अफवा आणि दहशत आहे. राज्यात मुलाला पळविल्याची एकही घटना घडली नाही पण भीती मात्र प्रचंड आहे. या भीतीतून वेगवेगळ्या घटना घडत असताना शाळकरी तीन मुलीनी धावत्या जीपमधून उड्या मारल्याची घटना घडली आहे. जिंतूर तालुक्यातील रीडज येथील शाळकरी मुली शाळेला जाण्यासाठी बोरीकडे निघाल्या होत्या. पाठीमागून येणाऱ्या एका प्रवासी जीपमध्ये त्या बसल्या. या मुलीना चांदज पाटीवर उतरायचे होते. वेगाने निघालेल्या जीप चालकाने बोरी येथे गावाच्या वेशीवर जीप थांबवलीच नाही. त्याने आपली जीप सरळ जिंतूरच्या दिशेने वळवली. शाळकरी मुली जीप थांबवायला सांगत असताना देखील चालक त्यांच्याकडे लक्ष  देत नव्हता. त्याने आहे त्याच वेगात आपली जीप सुरूच ठेवली आणि जीपमध्ये बसलेल्या मुली प्रचंड घाबरल्या. 


मुले पळविणारी टोळी वावरत असल्याबाबत रोज या मुलींच्या कानावर काही ना काही येत होते आणि आज त्यांनाच जीपचालक कुठेतरी घेवून निघाला होता. मुलीनी जीप थांबवायला सांगूनही तो थांबत नाही हे पाहून मुलींच्या मनात संशयाची जागा खात्रीने घेतली. आपल्याला पळवून चालवले आहे अशी खात्रीच होऊ लागल्याने यातील तीन मुलीनी धावत्या जीपमधून उड्या मारल्या. घाबरलेल्या मनीषा खापरे, दीपाली मुटकुळे, मेघना शेवाळे या तीन मुलीनी धावत्या जीपमधून उडी घेतल्याने खाली पडून त्या जखमीही झाल्या आहेत. या मुलीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आणि मुले पळविणाऱ्या टोळीबाबत अधिकच भीती निर्माण झाली. 


या घटनेची माहिती पोलिसांपर्यंत गेली आणि पोलीस तातडीने सदर जीपच्या शोधाला लागले. फारसे काही न करता ही जीप आणि जीपचालक किशन पानपट्टे पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मुले पळविण्याचा काहीच प्रकार नसल्याची बाब समोर आली. चालकाने कानात हेडफोन घातले असल्यामुळे मुलीनी गाडी थांबवायला सांगितल्याचे त्याला ऐकून गेले नाही आणि तो आपल्याच नादात जीप चालवत राहिला. (Fear of gang! School girl jumps from running jeep)मुली मात्र घाबरून गेल्या आणि गाडीतून उड्या मारल्या असा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. अखेर निष्काळजीपणे गाडी चालविल्याचा गुन्हा चालकावर दाखल करण्यात आला. सदरचे वाहन देखील पोलीसानी ताब्यात घेतले आहे.      



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !