BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑक्टो, २०२२

शिंदे गटात सहभागी व्हा, नाहीतर -------!

 



शोध न्यूज : शिंदे गटात सहभागी व्हा नाहीतर तडीपार करून एन्काऊंटर करण्याची धमकी एका पोलीस अधिकाऱ्यानेच दिली असल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला असल्याचे खळबळ उडाली आहे तर संबंधित अधिकाऱ्याने याचा इन्कार केला आहे. 


शिवसेनेतून फुटून चाळीस आमदार बाहेर पडल्यापासून राज्याच्या राजकारणाचे वातावरण प्रचंड प्रदूषित झाले आहे. राजकारण हे सज्जन माणसांसाठी उरले नसल्याचीही भावना निर्माण झाली आहे. जनतेच्या समस्या या राजकारणाच्या डावपेचात बाजूला पडलेल्या असून सामान्य लोकांनाही आता राजकारणाची किळस वाटू लागली आहे. जनतेच्या प्रश्नाशी कसलाही संबंध नसलेल्या गोष्टींचेच राजकारण होताना दिसत आहे. केवळ सत्ता हेच अंतिम ध्येय उरले असल्याचे दिसू लागले आहे. शिंदे गट  शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून आपल्या गटाची ताकद वाढविणे यालाच सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे दिसत असताना शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाने अत्यंत धक्कादायक आरोप करून थेट पोलीस उपायुक्त यांच्याकडेच बोट दाखवले आहे. (Threat of encounter from police to join Shinde group) पत्रकार परिषद घेवून हा मोठा आरोप केल्याने चर्चेचा विषय बनला आहे. 

 
भारतीय जनता पार्टी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना त्रास देत असल्याचे आरोप सतत होताच आहेत त्यात आता राज्यातील पोलीस यंत्रणा वादाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. शिवसेनेचे जेष्ठ आणि माजी नगरसेवक एम. के. मढवी यांनी पत्रकार परिषद घेवून पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ चे विवेक पानसरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेत खंबीरपणे राहिलेल्या निष्ठावंताना आपल्या गटात खेचून घेण्यासाठी शिंदे सरकार आता एन्काऊंटरच्या पातळीला उतरले असल्याचा आरोप मढवी यांनी केला आहे. 


शिंदे गट फुटला तरी आपण शिवसेनेत खंबीरपणे मातोश्रीच्या मागे उभे आहोत त्यामुळे माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याच्या हालचाली नवी मुंबई पोलिसांनी सुरु केल्या आहेत. आपण पोलीस उपायुक्त पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो असता त्यांनीही आपणास शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकावले. 'तुम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात सामील व्हा आणि विजय चौगुले यांच्या माध्यमातून या गटात प्रवेश करा, अन्यथा तुम्हाला तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू' असा दम पोलीस उपायुक्त यांनी दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.


शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आपणास एन्काऊंटरची धमकी पोलीस उपायुक्त यांनीच दिली असल्यामुळे आपण आणि आपले कुटुंब तणावात आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला दम दिला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 'तुम्ही मातोश्रीवर जाणे बंद करा, माझ्याकडे आल्यावर तुमच्यासह तुमच्या कार्यकर्त्यांचे भलेच  होणार आहे आणि तुमच्यासह तुमच्या कुटुंबाला कसलाही त्रास होलणार नाही, यापुढे मातोश्रीवर जाणे बंद करा' असा दम मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला असल्याचा आरोप मढवी यांनी केला आहे. सत्ताधारी मंडळीनी आता पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून दहशतवाद सुरु केला आहे याचा निषेध देखील करण्यात आला. 


या पत्रकार परिषदेस खासदार राजन विचारे, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्यासह पदाधिकारी तसेच शिवसेनेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.  शिंदे गटात सहभागी न होणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची छळवणूक सुरु असून त्यासाठी शासकीय यंत्रणेचा आणि पोलिसांचा गैरवापर केला जात असून यापूर्वी जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यानाही त्रास देण्यात आला आहे. या सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली नाही असे खासदार राजन विचारे यांनी म्हटले आहे.


आत्महत्या करू !
पोलीस आयुक्त यांनी केवळ एन्काऊंटर करण्याचीच धमकी दिली नाही तर आपल्याला खंडणीही मागितली आहे. आपले काही बरे वाईट झाले तर त्याला पोलीस उपायुक्त पानसरे, माजी आमदार संदीप नाईक, विजय चौगुले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार असतील. हा छळ असाच सुरु राहिला तर आपण कुटुंबासह पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयासमोर आत्महत्या करू असा इशारा शिवसेना माजी नगरसेवक मढवी यांनी दिला आहे.


सर्व आरोप खोटे !
मढवी यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची असून पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच त्यांच्यावर दंगलीचा देखील एक गुन्हा दाखल झाला आहे. तडीपार होण्याची भीती त्यांना वाटत असल्यामुळे त्यांनी हे खोटे आरोप केले आहेत असे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी म्हटले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !