BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑक्टो, २०२२

पंढरपूर - सांगोला मार्गावर अपघात, वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू !

 


शोध न्यूज : पंढरपूर - सांगोला मार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात साठ वर्षाच्या वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. थांबलेल्या वाहनामुळे अपघात होण्याची ही आणखी एक घटना घडली आहे. 


पंढरपूर - सांगोला रस्त्याचे रुंदीकरण झाल्यापासून या रस्त्यावर अपघाताची मालिकाच सुरु आहे. पंढरपूरपासून सांगोल्यापर्यंत विविध ठिकाणे ही अपघाताची केंद्रे बनली असून आजवर अनेक अपघात गेल्या दोन वर्षात घडलेले आहेत. या अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत तर कित्येक जखमी झाले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यावर अपघात कमी होण्याऐवजी त्यात वाढ झाली असून अमर्याद वेग हे या अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. बामणी, मांजरी या गावाच्या दरम्यान मात्र थांबलेल्या वाहनामुळे अपघात होताना दिसत आहेत. बामणी आणि मांजरी येथील वळण हे आधीपासूनच धोक्याचे ठरत असून समोरील वाहन न दिसल्यामुळे येथे अपघाताचा धोका सतत असतो.  


रस्त्यावर वाहने उभी केली जातात आणि समोरून आलेल्या वाहनाच्या प्रखर प्रकाशात ही उभी वाहने दिसत नाहीत त्यामुळे वेगात येणारे वाहन सरळ उभ्या वाहनावर जाऊन धडकून अपघात होत आहेत. अशाच प्रकारचा आणखी एक अपघात पुन्हा एकदा झाला असून यात वृद्ध शेतकऱ्याचा जीव गेला आहे. ६० वर्षे वयाचे शेतकरी वकील उस्मान मुजावर हे डाळिंब विक्रीसाठी सांगोला मार्केट यार्डात गेले होते. तेथून ते परत मांजरी गावाकडे येत असताना नरुटे वस्तीजवळ त्यांचा अपघात झाला. 


समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे रस्त्याच्या बाजूला थांबलेला कंटेनर त्यांना दिसला नाही आणि त्यांची दुचाकी जाऊन त्या उभ्या कंटेनरवर आदळली. कंटेनरला मागच्या बाजूने दुचाकीने दोराची धडक दिल्याने दुचाकी आदळून मुजावर हे खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला, मानेला जबर मार लागला आणि ते जागीच बेशुद्ध झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी हलवले. अपघातात जोराचा मार लागल्यामुळे उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिलखुश उस्मान मुजावर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 


पोलिसांनी कंटेनर चालक प्रकाश मिश्रा (उत्तर प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Accident on Pandharpur-Sangola road, old farmer dies) उभ्या असलेल्या वाहनाला धडकून होत असलेले अपघात या रस्त्यावर वाढत असून समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे उभी असलेली वाहने दिसत नसल्याचा आणखी एक बळी गेला आहे. 


भाविकाचा मृत्यू !

सोलापूर - तुळजापूर मार्गावरही एका अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत.  दुचाकीवरून निघालेल्या योगेश संतोष बेल्लारे या १७ वर्षे वयाच्या तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची आई सुवर्णा आणि बहिण वैष्णवी (१५) या जखमी झाल्या आहेत. सोलापूर - तुळजापूर सीमेवर राज्य परिवहन महामंडळाची बस आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला. सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील यमाईदेवीचे दर्शन घेवून तिघे दुचाकीवरून तुळजापूरकडे निघालेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेला योगेश हा लातूर येथील महाविद्यालयात शिकत होता. नवरात्रीनिमित्त दर्शनासाठी तो आपल्या आई आणि बहिणीला घेवून मार्डी येथे गेला होता आणि परत जात असताना ही घटना घडली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !