शोध न्यूज : मराठा समाजाबाबत अपशब्द काढलेल्या आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीने उघड आणि जाहीर धमकी दिली असून सावंत आणि राष्ट्रवादी यांच्यात मोठा संघर्ष सुरु होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना 'गद्दार' म्हणून शिवसेना सतत हिणवत असते शिवाय तानाजी सावंत हे आपल्या बलागम वक्तव्याबाबत कायम चर्चेत असतात. उच्चशिक्षित असतानाही तानाजी सावंत हे नेहमीच आक्षेपार्ह विधाने करून वाद ओढवून घेतात आणि यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागतो याचीही जाणीव त्यांना रहात नाही. वादग्रस्त विधानांच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या तानाजी सावंत यांनी नुकतेच मराठा समाजाबाबत अत्यंत संतापजनक विधाने केली आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाची तळी न उचलता मराठा समाज आरक्षणासाठी झगडत आहे परंतु त्यांना आरक्षण देण्यात राजकीय पक्षांनी फारसे स्वारस्य दाखवलेले नाही. मराठा समाजाच्या अनेक तरुणांचा बळी आरक्षणासाठी गेला आहे. असे असताना तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत चीड उत्पन्न होईल असे भाष्य केले आणि त्याचे पडसादही उमटले.
मराठ्यांना आत्ताच आरक्षणाची खाज आली, मराठा समाजाला आत्ताच आरक्षण आठवले का ? अशी विधाने करून मराठा समाजाला त्यांनी दुषणे दिल्याने मराठा समाज आक्रमक झालेला आहे. चोहोबाजूंनी संतापाच्या फैरी सुरु झाल्यावर सावंत यांना माफी देखील मागावी लागली आहे. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांनी उस्मानाबाद येथे अत्यंत कडक भडक शब्दात तानाजी सावंत यांचा समाचार घेत त्यांना थेट धमकी दिली आहे. 'माजलेला एक मंत्री मराठा समाजाबद्धल बेभानपणे बोलतो, तानाजी सावंतानी मराठा समाजाबद्धल व्यवस्थित बोलावे अन्यथा चौकात उघडा करून मारू, याचा माज उतरलाच पाहिजे' अशा शब्दात सावंत यांना पाटील यांनी धमकावले आहे. विशेष म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या साक्षीने पाटील यांनी हे विधान केले आहे.
यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील तानाजी सावंत यांचा समाचार घेतला. 'काही लोकांनी तर मराठा समाजाची खाज काढली, मराठा समाज काय त्यांच्या घराचा आहे काय ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. (NCP threatens Health Minister Tanaji Sawant) राष्ट्रवादीने 'भर चौकात उघडा करून मारू' अशी जाहीर धमकी दिल्याने सावंत आणि राष्ट्रवादी यांच्या आता चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद येथेच ही धमकी दिली गेली असून आता तानाजी सावंत यांच्याकडून कशा प्रकारे पत्युत्तर येतेय हे पहावे लागणार आहे. राजकीय वाद काहीही होत राहिला तरी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज संतप्त असून त्याची किंमत सावंत आणि शिंदे गटालाही चुकवावी लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !