BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ ऑक्टो, २०२२

आता नव्याने मिळालेले 'मशाल' चिन्ह देखील अडचणीत !

 



शोध न्यूज : अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह देखील अडचणीत आले असून समता पार्टीने या चिन्हावर दावा सांगितला आहे.


शिवसेनेत फुट पडून दोन गट तयार झाले आणि निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. अंधेरीतील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने तातडीने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 'मशाल' आणि शिंदे गटाच्या 'बाळासाहेबांची शिवसेने' ला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले आहे. अंधेरी निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असून या निमित्ताने रोज वेगवेगळ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. दोन्ही गटाला निवडणूक चिन्ह मिळाल्याने आता ही निवडणूक सुरळीत होईल असे वाटत असतानाचा शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळालेले मशाल हे निवडणूक चिन्ह आणखी एका वेगळ्या वादात सापडले आहे. 


'मशाल' हे चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष केला आणि हे चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरु देखील झाले, अत्यंत वेगाने हे चिन्ह घराघरात पोहोचले आहे पण उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी संपण्याची मात्र काहीच चिन्हे दिसत नाहीत. निवडणूक प्रक्रिया सुरु झाली तरीही पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महापालिकेतील राजीनामा अद्याप मंजूर नाही, शिंदे गटाने तर हा उमेदवारच फोडण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याचे सांगण्यात येवू लागले आहे आणि त्यातच नुकत्याच मिळालेल्या मशाल या निवडणूक चिन्हावर देखील समता पार्टीने दावा केला आहे. 'मशाल' हे निवडणूक चिन्ह आमचे आहे असा समता पार्टीचा दावा आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आणि वाढविल्या जात असल्याचे समोर येत आहे. 


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले 'मशाल' हे निवडणूक चिन्ह आपले असून १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडेच असल्याचा दावा समता पार्टीने केला आहे. केवळ दावा करून समता पार्टी थांबलेली नाही तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार दिला जाणार असल्याची घोषणाही समता पार्टीने केली असून त्यामुळे निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोग आज निर्णय देईल अशी अपेक्षा समता पार्टीने व्यक्त केली आहे. (The Thackeray group's 'mashal' symbol is also in trouble) त्यामुळे निवडणूक आयोग मशाल हे चिन्ह माघारी घेवून ठाकरे गटाला पुन्हा दुसरे चिन्ह देणार काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 


निवडणूक आयोग पूर्ण तपासणी करूनच कुठल्याही पक्षाचे निवडणूक चिन्ह अंतिम करीत असते. समता पार्टीकडे १९९६ पासून 'मशाल' हे चिन्ह असेल तर ते शिवसेना ठाकरे गटाला दिलेच कसे? हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील आरोप होऊ लागले असताना आणि ठाकरे गट उच्च न्यायालयात गेलेला असताना हा नवा पेच निर्माण झाला आहे. आता पुन्हा चिन्हांची अदलाबदल करावी लागली तर मात्र निवडणूक निर्णय आयोगाची विश्वासार्हता धोक्यात येण्याची शक्यता आहे. समता पार्टीने केलेला दावा हा किती दमदार आहे यावर चिन्हाचे भविष्य अवलंबून आहे. समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृनेश देवळेकर यांनी मशालीवर दावा सांगितला आहे पण २००४ साली राज्य पक्ष म्हणून समता पक्षाची मान्यता काढून घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. 


उमेदवारीही अडचणीत !
अंधेरी पूर्व पोट निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरु झाली असून उमेदवार देखील घोषित करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजप कडून मुरजी पटेल यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत परंतु लटके यांचा महापालिकेतील कर्मचारी पदाचा राजीनामा अजून मंजूर झालेलाच नाही त्यामुळे ही उमेदवारी अडचणीत आली आहे. ठाकरे गटाची जोरदार धावाधाव सुरु असून काय होतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.  


फोडाफोडी सुरूच ?
शिंदे गटाकडून ठाकरे गटातील लोकप्रतिनिधी फोडले, पदाधिकारी फोडले परंतु आता या निवडणुकीतील उमेदवारच फोडण्याच्या जोरदार हालचाली सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच फोडण्याचा प्रयत्न होऊ लागल्याची मोठी चर्चा बाहेर आली असून असे घडले तर उद्धव ठाकरे यांना हा आणखी एक मोठा धक्का ठरणार आहे. लटके या आधीच शिंदे गटात जाणार होत्या, भाजप उमेदवाराने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती परंतु तसे न घडल्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाणे थांबवले असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !