BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑक्टो, २०२२

निवडणूक ! मोफत दारू आणि वीस रुपये लिटर पेट्रोल !

 



शोध न्यूज : भावी सरपंच भलतेच उदार झाले आणि त्यांनी फुकटात दारू तर पेट्रोल केवळ वीस रुपयात देण्यासह अनेक आश्वासने देवून टाकली! या आश्वासनांचे काय होईल हे सर्वाना माहीतच आहे पण सरपंच होण्याआधी त्याला प्रसिद्धी मात्र मोठीच मिळू लागली आहे.


कुठलीही निवडणूक आली की तिच्यासोबत घोषणा आणि पूर्ण न होणारी आश्वासने येतातच ! भली मोठी आश्वासने दिली जातात आणि ती पूर्ण होणार नाहीत याची जाणीव असतानाही मतदार फसत असतात हे भारतीय लोकशाहीत काहीच नवे नाही. निवडणुका झाल्या की ही आश्वासने हवेत विरून जातात. ज्यांनी आश्वासने दिली ते सोयीस्कर विसरून जातात आणि ज्यांनी घेतली ते मात्र पाच वर्षे त्याची वाट पहात बसतात. आश्वासनाची आठवण करून दिली तर कुणी त्याला 'चुनावी जुमला' म्हणते ते तर कुणी त्यापुढेही लोकांना नादी लावताच राहते. 'अच्छे दिन' आणि 'पंधरा लाख खात्यावर जमा होणार' याची सर्वाना चांगलीच आठवण आहे.


गल्ली ते दिल्ली अशा सगळ्याच निवडणुकावेळी घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडतो पण आता एका भावी सरपंचाने दिलेल्या आश्वासनांची देशभर चर्चा होऊ लागली आहे. त्याच्या आश्वासनाचा फलक देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. निवडणुकीत दिलेली अनेक आश्वासने न पटणारी असतात पण या भावी सरपंच महोदयाने दिलेली आश्वासने तितकीच आश्चर्यचकित करणारी आणि पूर्ण होणारच नाहीत याची खात्री असलेलीच आहेत. सद्या देशात ग्रामपंच्यात निवडणुका सुरु आहेत आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील भली मोठी आश्वासने देवून भावी सरपंचाने देशभरचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. 


हरियाणामधील सिरसाढ ग्रामपंचायतीच्या सरपंचांची निवडणूक लागली आहे. त्यामुळे भाई जयकरण लढवाल या एका उमेदवाराने एक भले मोठे आश्वासन पत्र छापले आहे तसेच फलकही लावले आहेत. ग्रामपंचायत निवडणूक म्हटले की गावापुरती काही मर्यादित आश्वासने असून शकतात. या उमेदवाराने मात्र अशी काही आश्वासने दिली आहेत की ही निवडणूक सरपंच पदाची आहे की पंतप्रधानपदाची आहे ? असा प्रश्न नकीच पडू शकतो. (Sarpanch elections, free liquor and cheap petrol) त्यातील काही आश्वासने ही तर धक्कादायक गटात मोडली जात आहेत. निवडणूक म्हटले की दारू आणि मटण याची रेलचेल असतेच पण या भावी सरपंचाने पुढील पाच वर्षांसाठी याची सोय करण्याची हमी दिली आहे. 


दारू पिणाऱ्यासाठी रोज एक बाटली मोफत देण्याचे आश्वासन या भावी सरपंचाने दिले आहे.  गावातील दारू तसेच अवैध व्यवसाय बंद करण्याची खोटी का होईना आश्वासने दिली जातात पण या भावी सरपंचाने रोज एक बाटली मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. देशात पेट्रोलचे दर विक्रमी वाढत असून त्यात रोज भर पडत आहे पण हे भावी सरपंच मात्र २० रुपये लिटर दराने पेट्रोल देणार आहेत. इथपर्यंत हे महोदय थांबले नाहीत तर गावात तीन विमानतळ उभारण्याचे आश्वासन देखील त्यांनी गावकऱ्याना दिले आहे. आता अशी आश्वासने दिल्यावर चर्चा तर होणारच आहे पण त्यांचे हे आश्वासन पत्र पोलीस अधिकारी अरुण बोथरा यांनी आपल्या ट्वीटर वरून शेअर केल्यामुळे देशभरात ही आश्वासने पोहोचली आहेत.


या भावी सरपंच महोदयाने तब्बल तेरा आश्वासने देवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. रोज सरपंचाचा 'मन की बात' कार्यक्रम, महिलांसाठी मोफत मेकअप किट देणार, गावात तीन विमानतळ उभारणार, गावातील नागरिकांसाठी २० रुपये दराने पेट्रोल देणार,  १०० रुपये दराने गॅस सिलेंडर देणार, गावापासून दिल्लीपर्यंत मेट्रो रेल्वेची व्यवस्था करणार, जीएसटी बंद करणार, प्रत्येक कुटुंबासाठी एक दुचाकी मोफत देणार, गावात वाय फाय सुविधा उपलब्ध करणार, व्यसनी व्यक्तींसाठी रोज एका बाटली दारू मोफत देणार अशा प्रकारच्या आश्वासनांची एक यादीच या भावी  सरपंच महाशयांनी छापली आहे. 


आश्वासनांची ही यादी वाचून कुणी आश्चर्य व्यक्त करीत आहे तर कुणी मनमुराद हसत आहे.  कुणी 'हे महाशय सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत की देशाच्या पंतप्रधानपदासाठी ?' असे सवाल करीत आहेत. धम्माल आश्वासने देणाऱ्या या भावी सरपंच महाशयांनी आपल्याच हाताने आपली आरती देखील ओवाळून घेतली आहे. स्वत:ला भावी सरपंच तर त्यांनी म्हटले आहेच पण सुशिक्षित, प्रामाणिक, कष्टाळू अशी उपाध्या देखील त्यांनी आपल्या नावापुढे लावल्या आहेत. खूप निवडणुका आणि खूप उमेदवार लोकांनी पाहिले आहेत, घोषणा आणि आश्वासनेही पाहिली आहेत पण असा प्रकार पहिल्यांदाच लोक पहात असल्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे. एका गावातील निवडणुकीची चर्चा देशाच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे.  





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !