BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑक्टो, २०२२

अकलूज येथे नकली दारूचा कारखाना उघडकीस !





शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे नकली दारूचा एक कारखाना उघडकीस आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून दोघांना अटक केली आहे तर अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


नकली बनावटीच्या दारूचा मोठा प्रभाव असून कोरोनाच्या काळात तर अशा अवैध आणि नकली दारूचा महापूर आल्याचे दिसत होते. कोरोना प्रतिबंधामुळे शासनमान्य मद्य विक्रीची सर्व दुकाने शासनाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. याचा गैरफायदा उठवत नकली बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात चोरून आणि महागड्या किमतीला विकली जात होती. मद्य विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे हा धंदा जोरात सुरु होता. प्रचंड कमाईचे एक साधन बनले होते. एरवीही नकली बनावटीच्या दारूंचा अधूनमधून पर्दाफाश होत असतोच. हॉटेल. ढाबे अशा ठिकाणी अवैधरित्या विकण्यात येत असलेल्या नकली दारूबाबत नेहमीच चर्चा होते आणि कधीतरी कारवाई होते. आता मात्र अकलूज येथे चक्क नकली दारू तयार करणे आणि ती बाटल्यातून भरण्याचा उद्योग करणारा कारखानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला आहे.


उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अकलूज येथील एका गोदामावर छापा टाकला असता नकली बनावटीची दारू तयार केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. बनावट दारू तयार करून ती बाटलीत भरून नकली लेबल चिकटवली जात होती तसेच नकली बुचे लावली जात होती. त्यासाठी लागणारे साहित्य देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना या गोदामात आढळूनआले आहे. बनावट देशी दारू, बुचे, गोव्याची दारू ,वाहन इत्यादी. सह ११ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने या गोदामातून जप्त करून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अकलूज येथील राऊतनगर परिसरात असा एक अवैध कारखाना चालत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यानुसार या भागात पाळत ठेवण्यात आली होती.


सोनाज पेट्रोल पंपाच्या मागच्या बाजूस एका गोडावूनवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या वेळेस धाड टाकली तेंव्हा येथे नकली बनावटीची देशी दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले. नकली दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, तयार करण्यात आलेली दारू, देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे, सिलिंग मशीन, स्वाद अर्क, गोवा राज्यातील दारूच्या पेट्या, विदेश दारू असा सगळाच "खजिना" या ठिकाणी आढळून आला. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने इंदापूर तालुक्यातील बावडा येथील प्रदीप रमेश माने आणि अकलूज येथील शंकर पंडित चुनाडे या दोघांना अटक करण्यात आली आहे शिवाय एकूण आ लाखांपेक्षा अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ चे कलमांतर्गत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या छाप्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठे घबाड जप्त केले आहे.  १८० मिली क्षमतेच्या बनावट देशी दारू टॅंगोपंच-१० बॉक्स, देशी दारू टॅंगो पंच बनावट तयार ब्लेंड- ३७० लिटर, देशी दारू टॅंगो पंच बनावट तयार कॉन्सन्ट्रेटेड ब्लेंड- ५०० लिटर, गोवा राज्य निर्मित अॅड्रीयल व्हिस्की ७५० मिली क्षमतेच्या-  १९ बाटल्या, कॅप सिलिंग मशीन, देशी दारू टॅंगो पंच प्लास्टिक बुचे- २० हजार नग,गोवा राज्य निर्मित मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की १८० मिली क्षमतेचे- ६ बॉक्स, इम्पेरियल ब्लू विदेशी मद्याची बुचे- ५०० नग, मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की विदेशी दारूचे बुचे- ५००  नग,  देशी दारू टॅंगो पंच लेबल १८० मिली क्षमता – ३२,००० नग, १८० मिली क्षमतेच्या देशी दारू टॅंगो पंच रिकाम्या बाटल्या – ७००० नग, २० लिटर क्षमतेचे रिकामे प्लास्टिक कॅन-८,  विदेशी दारू तयार करण्यासाठी इसेन्स कॅरमल २०० मिली क्षमतेची एक बॉटल, बनावट दारू बाटल्यात भरण्यासाठी नरसाळे- १, पाण्याचा मोटर पंप- १, चिकटपट्टी बंडल- ७०, मोबाईल- २, पिकअप वाहन-१ (एमएच ४३ एम ९१०२) असा ११ लाख ५८ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


अशा प्रकारच्या नकली बनावटीच्या दारूने शासनाचा महसूल तर मोठ्या प्रमाणात बुडतोच परंतु अशी दारू आरोग्याला देखील अपायकारक असते. अवैध मार्गाने पैसा मिळविण्यासाठी असे उद्योग केले जातात. राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा निर्मितीवर आणि विक्रीवर कारवाई करीत असले तरी सगळीकडेच ही कारवाई होण्याची शक्यता नसते. (Fake liquor factory exposed in Akluj, two arrested)  नकली बनावटीची दारू कुठल्या ठिकाणी विकली जात होती याची माहिती देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केल्यास जनतेलाही याची माहिती होईल आणि अशा ठिकाणी जाणे लोक टाळतील. नकली दारू विकून नोटा छापणाऱ्याचे बुरखे देखील यामुळे फाटले जातील. संबंधित हॉटेल, ढाबे यांचा मुखवटा फाटणे आवश्यक बनले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !