BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ ऑक्टो, २०२२

शिंदे गटातील कार्यकर्त्यांना शिवसेनेतील महिलांनी चोपले !

 



शोध न्यूज : दसऱ्याच्या मुहूर्तावर आज एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्त्यांना भररस्त्यात शिवसेनेच्या महिलांनी चोपले असल्याचा प्रकार समोर आला असून हा संघर्ष राजकीय नव्हे तर वेगळ्याच कारणावरून झाल्याचे सांगण्यात आले आहे. 


परंपरेनुसार शिवसेनेचा आणि बंडखोरीनंतर आमचीच शिवसेना म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा आज मुंबईत होत आहे. या दोन्ही मेळाव्याबाबत प्रसार माध्यमातून वेगवेगळे आरोप होत असले तरी आज सकाळपासून शिंदे गटाचा मेळावा हा वादग्रस्त ठरताना दिसत आहे. दहा कोटी रुपये खर्च करून शिंदे गटाने राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुक केल्याचा विषय आधीच वादाचा ठरत आहे. एवढा खर्च कोठून केला जातोय? असा सवाल विरोधक विचारू लागले असून सामान्य नागरिक देखील हा खर्च पाहून तोंडात बोट घालू लागला आहे. तीन लाख कार्यकर्ते मेळाव्यास येतील असा अंदाज धरून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय देखील शिंदे गटाने केली आहे. शिवाय या मेळाव्यासाठी जाणाऱ्याना प्रत्येकी एक हजार रुपये दिले जात असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. 


प्रसार माध्यमातून आज सकाळपासून शिंदे गटाच्या मेळाव्याबाबत वेगवेगळ्या बातम्या येत असून अनेक ठिकाणी एस टी या कार्यकर्त्यांची वाट पहात रिकाम्या खोळंबल्या असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दाखवले आहे तर मेळाव्यास जाणाऱ्या लोकांना आपण मुंबईला नक्की कशासाठी चाललो आहोत हेच या लोकांना माहित नाही असे दाखविणाऱ्या बाईट प्रसारित होत आहेत. शिंदे गटाच्या गाडीतून जाणारे लोक "उद्धव ठाकरे यांच्या सभेला" जात असल्याचे सांगत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचे वेगळेच मनोरंजन होताना दिसत आहे. दरवषी शिवसेनेचा मेळावा होतो आणि त्यासाठी महाराष्ट्रातून प्रचंड संख्येने शिवसैनिक दाखल होतात पण कधीच वाहने, खाणेपिणे आदी कसलीही व्यवस्था शिवसेनेला करावी लागली नाही. यावर्षी मात्र शिंदे गटाने हे सगळेच केल्याने व्हायची ती चर्चा होऊ लागली आहे. 


शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असताना मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या महिलांनी रस्त्यात चोपले असल्याचे समोर आले असून यामुळे शिंदे गटाच्या प्रतिमेला पुन्हा एकदा धक्का लागला आहे. शिंदे गटाकडून बस, खाजगी वाहने अशी विविध व्यवस्था करून मुंबईला नेले जात आहे तर शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आपल्या खर्चाने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईकडे जाताना नाशिक मुंबई मार्गावर मात्र या दोन्ही गटात राडा झाला आहे आणि याची चर्चा राज्यभर होऊ लागली आहे. (Shiv Sena women beat workers of Shinde group) शिंदे गटातील कार्यकर्ते मुंबईला खाजगी वाहनातून निघाले होते तर महिला शिवसैनिक एका बसमधून मुंबईकडे निघाल्या होत्या. मुंबईला पोहोचण्याआधीच रस्त्यावर या दोन्ही गटात राडा झाला. 


शिंदे गटाची बोलेरो आणि शिवसेना महिलांची बस मुंबईकडे जाताना ओव्हरटेक करतेवेळी शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या महिलांकडे हातवारे करून अश्लील इशारे केले असे शिवसेनेच्या महिलांचा आरोप आहे. या महिलांनी आपली बस थांबवत शिंदे गटाची बोलेरो थांबवली आणि भर रस्त्यात वेगळाच धिंगाणा सुरु झाला. अश्लील हातवारे आणि इशारे केल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या महिला चवताळून शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या अंगावर जात होत्या. जाब विचारात महिलांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना गाडीतून खाली ओढून चोपले. 


मुंबईला पोहोचण्याआधी रस्त्यावरच बराच वेळ हा राडा झाल्यावर या महिलांनी आपल्या भाषेत समज देत पुढचा प्रवास सुरु केला. शिंदे गटातील आमदार, मंत्री हे धमक्याची भाषा वापरत असल्यामुळे राज्यात चर्चा होत असतानाच महिला शिवसेनेकडून आज त्यांच्या कार्यकर्त्यांची धुलाई देखील करण्यात आली. राज्यभर या विषयाची चर्चा सुरु झाली असली तरी अशा प्रकारामुळे शिंदे गटाच्या प्रतिमेला मात्र धक्का लागत आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !