BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ ऑक्टो, २०२२

बिबट्याच्या हल्ल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू !

 



शोध न्यूज : बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून बिबट्याने  गळा पकडून सदर तरुणीला दीडशे फूट फरफटत नेले आणि उसाच्या पिकात तिचा मृतदेह आढळून आला.


बिबट्याचा वावर हल्ली सगळीकडे असल्याचे सांगण्यात येते परंतु बिबट्या मात्र हाती लागत नाही. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात धुमाकूळ घातलेला बिबट्या मारला गेला पण त्यानंतरही पंढरपूर, मोहोळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अधूनमधून कुणी ना कुणी सांगत आहे. वन विभाग ठसे घेवून जात आहे पण बिबट्याबाबत नेमके स्पष्टीकरण होत नाही. बिबट्या पाहिल्याचे कुणी सांगते तर कुणी त्याचे ठसे दाखवत असते. बिबट्या आहे की नाही याबाबत सतत वादविवाद सुरूच असतात पण शिरूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि वाईट बातमी समोर आली आहे. या परिसरात गेल्या महिनाभरात ही चौथी घटना आहे त्यामुळे बिबट्याची दहशत वाढली आहे. 



शिरूर तालुक्यातील जांबूत येथील जोरी मळ्यात ही थरारक घटना घडली आहे. घराच्या मागच्या बाजूस गेलेल्या पूजा भगवान नरवडे या १९ वर्षीय तरुणीवर बिबट्याने हल्ला केला. बी ए च्या वर्गात शिकत असलेली पूजा घरी एकटीच होती. तिचे वडील बाहेरगावी गेले होते. पूजा ही घराच्या मागच्या बाजूला लघुशंकेसाठी गेली परंतु तेथे आधीच बिबट्या दबा धरून बसला होता. या बिबट्याकडे तिचे लक्ष गेले आणि तिने घाबरून आरडाओरडा सुरु केला पण तेवढ्यात या बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिचा आरडाओरडा ऐकून शेजारील लोक धावत आले पण दरम्यान बिबट्याने तिच्या गळ्याला पकडून ऊसाच्या पिकात ओढत फरफटत नेले. पडत्या पावसात लोक हातात काठ्या घेवून ऊसाच्या पिकात शोध घेवू लागले. जेंव्हा हा बिबट्या दिसला तेंव्हा तो या तरुणीचे लचके तोडत होता.

 
ही थरारक घटना पाहून तरुणांचाही थरकाप उडाला. या तरुणांनी आरडा ओरडा करीत बिबट्यावर काठ्या उगारल्या तेंव्हा त्यांना घाबरून बिबट्या पुन्हा ऊसाच्या पिकात पळून गेला.  गळा पकडून तरुणीला फरफटत दूर अंतरापर्यंत नेल्याने आणि बिबट्याने लचके तोडल्याने तरुणीच्या मृतदेहाची अवस्था न पाहण्यासारखी झाली होती. बिबट्याच्या या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला असून परिसरात पुन्हा एकदा बिबट्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात बिबट्याचा सतत वावर असून महिन्याभरात बिबट्याने मानवावर केलेल्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही आता धोक्याचे वाटू लागले आहे. (College student dies in leopard attack) वन विभागाने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे परंतु बिबट्या हल्ले करीतच सुटला आहे. 


जांबूत गावाच्या परिसरात प्रचंड भीती निर्माण झाली असून ५ ऑगस्ट रोजी याच वस्तीवर अशीच एक घटना घडली होती. ३५ वर्षे वयाच्या सचिन बाळू जोरी यांचा मृतदेह उसाच्या फडात आढळून आला होता. त्यांच्या शरीराचे लचके तोडण्यात आल्याचे दिसत होते. या घटनेच्या दोन दिवसानंतर जांबूत येथील ६२ वर्षे वयाचे हरिश्चंद्र बारकू वाघमारे आणि पिंपरखेड येथील पंचतळे परिसरातील ३० वर्षीय संजय नाना दुधवडे या शेतमजुरावर हल्ला करण्याच्या घटना घडलेल्या आहेत. मागील वर्षी याच गावातील जोरी लवण भागातील समृद्धी योगेश जोरी या अडीच वर्षाच्या मुलीवर देखील बिबट्याने हल्ला केला होता आणि तिचाही यात मृत्यू झाला होता. सतत आणि एकामागून एक अशा घटना घडत असल्याने या परिसरातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !