BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

साखर कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध पंढरीत ऊस परिषद !






शोध न्यूज : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि कारखानदारांची मनमानी थांबविण्यासाठी पंढरीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 
सोलापूर जिल्ह्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते परंतु सोलापूर जिल्हा हा कायमच ऊस दराच्या बाबातीत मागे असलेला जिल्हा आहे. चांगल्या दरासाठी शेतकरी सतत संघर्ष करीत आहेत परंतु साखर कारखानदार त्याला जुमानत नाहीत आणि २२०० ते २३०० पेक्षा अधिक दर देत नाहीत. शेतकरी विविध अडचणीतून ऊस पिकवतो, कर्ज काढून आणि घाम गाळून ऊस वाढवतो, खतांच्या किमती आणि मजुरीचे दर सतत वाढत जात आहेत पण शेतकऱ्यांना कारखान्याकडून अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकरी एकवटला असून २३ ऑक्टोबर रोजी पंढरपूर येथे भव्य ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ऊस दर संघर्ष समितीचे सचिन पाटील यांनी दिली आहे.  


साखर कारखानदार यांची मनमानी थांबून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे. चालू गळीत हंगामात किमान तीन हजार रुपयांची पहिली उचल देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा उस उत्पादनात राज्यात प्रथम असूनही दाराच्या बाबतीत मात्र सोलापूर जिल्हा हा  कायम शेवटच्या क्रमांकावर असतो. अशी विसंगती कशासाठी ? असा जाब या परिषदेत साखर कारखानदारांना विचारला जाणार आहे. अशी माहितीही पाटील यांनी आज दिली आहे. 


 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व शेतकऱ्याची तरुण पोरं आता पेटून उठली आहेत,  महागाईमुळे उसाचा उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट झाला खताचे दर वाढले डिझेलचे दर वाढल्यामुळे मशागतीचे दर वाढले मजुरीचे दर वाढले परंतु ऊसाला मिळणारा दर हा कमी कमी होत चाललाय आणि काही कारखानदार तर मागील वर्षीच्या उसाचा दर सुद्धा अजून द्यायला तयार नाहीत अशा परिस्थितीत आता संघर्ष केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. (Organization of sugarcane conference at Pandharpur) ही भूमिका घेऊन जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र आले आहेत आणि त्याचाच भाग म्हणून ऊस आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आणि पंढरपूर ऊस परिषद ला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 


सदर परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी जिल्ह्यातील तालुका तालुक्यात संघर्ष समितीच्या बैठका, गाठीभेटी घेतल्या जात आहेत, पंढरपूर तालुक्यातही गाव भेट दौरा सुरु करण्यात आला आहे.  या अनुषंगाने गाव गाड्यातला ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी आक्रमक झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या गाळप हंगामाची पहिली उचल ठरल्याशिवाय ऊसतोड घेऊ नये असे आवाहन ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  सोलापूर जिल्ह्यातील तसेच पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस परिषद साठी उपस्थित रहावे व आपल्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी निघालेल्या दिंडीमध्ये सर्वांनी पक्ष, पार्टी, गट बाजूला ठेवून ऊस परिषदेत सहभागी असे आवाहन संघर्ष समितीचे सचिन पाटील यांनी केले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !