विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
शोध न्यूज : दसरा सण म्हटलं की रावणाचे दहन करण्यात येते परंतु महाराष्ट्रात एका गावात याच रावणाची पूजा करण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे.
मर्यादा पुरुषोत्तम श्री रामाची पूजा आणि रामाचा शत्रू असलेल्या राक्षसाची अर्थात रावणाची हेटाळणी केली जाते. एक वाईट प्रवृत्ती म्हणून रावणाकडे पाहिले जाते परंतु महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील सांगोळा गावात रावणाची पूजा करण्याची अडीचशे वर्षांपासूनची परंपरा आहे. मोठ्या श्रद्धेने गावकरी ही परंपरा जोपासत आलेले आहेत. गावातील सर्व जातीधर्माचे लोक रावणाच्या मूर्तीची नियमित पूजा करीत असतात. विजयादशमीच्या दिवशी देशभर रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते पण या गावत मात्र अत्यंत उत्साहात रावणाची पूजा केली जाते.
रावणाच्या राज्यावर रामराज्याचा विजय आणि असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमीचा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. रावण म्हणजे एक वाईट प्रवृत्ती असल्याचे मानले जाते आणि रावणाच्या दुष्कृत्याचे अनेक किस्से आपल्याला लहानपणापासून ऐकिवात असतात त्यामुळे रावणाबद्धल राग आणि तिरस्काराची भावना निर्माण झालेली असते. सीतामाईला पळवून नेण्याच्या त्याच्या घटनेने रामायण घडल्याचे सर्वांनाच माहित आहे. आणि या घटनेतील खलनायक म्हणून रावणाची ओळख आहे. दुष्ट आणि दुर्जन अशी प्रतिमा असलेल्या रावणाच्या पुतळ्याचे विजयादशमीच्या दिवशी दहन होत असतानाच सांगोळा गावात मात्र त्याची पूजा होत असते.
गाव म्हटलं की मंदिर आणि देवदेवतांच्या मूर्ती असतातच पण या गावात रावणाची साडे चार फुट उंचीची रावणाची मूर्ती आहे. काळ्या दगडातील रावणाची मूर्ती पाहून कुणीही आश्चर्यचकित होईल. देशात श्रीरामाची पूजा होत असताना रामाच्या शत्रूची पूजा ही कल्पना मनाला न पटणारी आहे पण या गावात वर्षानुवर्षे ही परंपरा अबाधित आहे. सांगोळा हे गाव तसं फार मोठं नाही, जेमतेम दीड हजार लोकवस्तीचे हे गाव आहे पण रावणाच्या मूर्तीमुळे हे गाव 'रावणाचं सांगोळा' अशा अर्थानेही ओळखलं जातं. रावणाच्या या मूर्तीमुळे या गावाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
रावणाची मूर्ती या गावात कशी स्थापन झाली याचे अनेकांना कुतूहल आहे पण गावकरी मात्र या मूर्तीबाबत एक आख्यायिका सांगत असतात. गावात ग्रामदेवतेसमोर असलेल्या झाडाची एक दगडी प्रतिकृती बनवावी म्हणून बाभूळगाव येथील एका शिल्पकारास सांगण्यात आले होते. शिल्पकाराने गावकरी सांगतात तशी मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती झाडाची न बनता दहा तोंडाच्या पुरुषाची मूर्ती साकारली गेली. आता या मूर्तीचे करायचे काय ? असा प्रश्न गावकऱ्याना पडला. 'मूर्ती तयार तर झाली आहे त्यामुळे गावात न्यावी तर लागेल, गावात नेल्यावर काय करायचे ते ठरवता येईल' म्हणून ही मूर्ती बैलगाडीत घालून गावाच्या दिशेने गाडी निघाली.
बाभूळगाव येथून मूर्ती घेवून ही बैलगाडी निघाली की प्रत्येक गावाच्या हद्दीवर बैलगाडी अडून राहू लागली. काही केल्या बैल पुढे जायला तयार होत नव्हते. या घटनेने गावकरी देखील बुचकळ्यात पडले. असे का होतेय याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. शेवटी गावकऱ्यानी प्रत्येक हद्दीवर नारळ फोडून या मूर्तीची गावात प्रतिष्ठापना करू असे मान्य केले आणि मग त्यानंतर ही बैलगाडी पुढच्या कुठल्याच गावाच्या हद्दीवर अडकली नाही. कसलीही अडचण न येता ही मूर्ती गावात पोहोचू शकली अशी आख्यायिका असल्याचे गावकरी आजही सांगतात.
या गावात आलेल्या या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रावण म्हणून कधीही या मूर्तीविषयी अथवा रावणाविषयी राग, तिरस्कार व्यक्त केला जात नाही. (Ravana was also worshiped in a village in Maharashtra) कधीही या मूर्तीची विटंबना होत नाही, उलट गावातील लोक या मूर्तीची पूजा करतात. रावणाचा शेवट करून रामराज्य निर्माण झाले पण याच रामराज्यात रावणाची पूजा केली जाते याचे अनेकांना आश्चर्य वाटत असले तरी सांगोळा गावाने वर्षानुवर्षे ही परंपरा जपली आहे आणि आजही ती सुरूच आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !