BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ ऑक्टो, २०२२

'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..' हा तर दैवी चमत्कार !

 



शोध न्यूज : 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..समदं ओक्के' हे बहुचर्चित ठरलेले एक वाक्य सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना राज्यभर प्रसिद्धी देवून गेले पण हे वाक्य म्हणजे एक 'दैवी चमत्कार' असल्याचे आमदार पाटील सांगत आहेत. 

 

शिवसेनेतून चाळीस आमदार बाहेर पडले आणि ते सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. यावेळी आमदारांचे फोन 'नॉट रिचेबल' असल्याची मोठी चर्चा होत होती. याच दरम्यान सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला. एका समर्थक कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना त्यांनी 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..' अशा शब्दात गुवाहाटीच्या निसर्गाचे वर्णन केले होते. तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि खास माणदेशी स्टाईलने त्यांनी केलेले हे वर्णन राज्यभर गाजले आणि राज्याच्या बाहेर देखील शहाजी पाटील यांचे नाव पोहोचले. राज्यातील राजकीय परिस्थिती संकटात असताना बंडखोर आमदार कसा निसर्गाचा आनंद घेत आहेत यावर टीकाही झाली पण 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..' मात्र गाजत राहिले आहे. एक प्रकारे आमदार शहाजीबापू पाटील हे एका वाक्याने सेलेब्रेटी बनून गेले आहेत. 

 

सांगोल्याच्या पलीकडे फारसे न पोहोचलेले शहाजीबापू आता राज्यातील प्रसिद्ध नेते बनले आहेत. राज्यातून त्यांना विविध कार्यक्रमांची निमंत्रणे येऊ लागली आहेत आणि बापू देखील या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहेत. याचवेळी सोशल मीडियावरून सांगोल्यातील मतदारांच्या समस्या देखील सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..' हे वाक्य गाजले आणि विविध वृत्तवाहिन्यांनी बापूना प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. लोक कौतुकाने वाचतात, पाहतात म्हणून प्रसार माध्यमांच्या नजरा बापूंकडे वळल्या आहेत. बापूंच्या कुठल्याही कार्यक्रमाची आणि विधानांची आता बातमी बनू लागली आहे. जशी प्रसिद्धी मिळू लागली तसे सांगोल्याचे बापू अधिकच 'फार्मात' येऊ लागले आहेत. फोनवर बोललेले एक वाक्य एवढे काही करील असे कुणालाच काय पण स्वत: शहाजीबापू पाटील यांना देखील कधी वाटले नव्हते. त्यामुळेच त्यांना आता हा एक दैवी चमत्कार वाटू लागला असल्याचे दिसत आहे.


एका वाक्यामुळे एवढी प्रसिद्धी मिळणे हे तसे चमत्कार वाटण्याजोगे आहे. सहज बोललेले एक वाक्य देखील किती प्रसिद्धी मिळवून देते हे 'काय झाडीकाय डोंगारकाय हाटील..' या वाक्याने दाखवून दिले आहे. हे वाक्य एवढे गाजले त्याच्यावर गाणी देखील आली आणि ते बहुचर्चित देखील झाले. त्यामुळे हे वाक्य उच्चारणाऱ्या आमदार शहाजी पाटील यांना हा चमत्कार वाटणे हे देखील स्वाभाविकच आहे. (kay jhadi, kay dongaar, miracle) सांगोल्यातील अहिल्यादेवी होळकर सभागृहात एका कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी स्वत:च या "चमत्कारा"बाबत भाष्य केले आहे. 'काय झाडीकाय डोंगारकाय हाटील..' या एका वाक्याने माणदेशी भाषेचा टोन देशात प्रसिद्ध झाला असून आपल्याला परदेशातून देखील कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले आहे. 'काय झाडीकाय डोंगारकाय हाटील..' हे वाक्य आपल्या तोंडून येणे आणि त्यांना देशभर, जगभर प्रसिद्धी मिळणे हा एक दैवी चमत्कारच आहे असे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !