BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ ऑक्टो, २०२२

लंपी : सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवसात चार गाईंचा मृत्यू !

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी चार गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली असून यामुळे पशुपालकांची चिंता वाढीस लागली आहे.


देश आणि राज्य पातळीवर लम्पीचा प्रादुर्भाव असून यामुळे पाळीव जनावरांच्या जीवितालाच धोका होऊ लागल्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. काही करून आपली जनावरे वाचविण्याची त्यांची प्राथमिकता असून प्रशासन देखील दक्ष आहे. पशुधन वाचविण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून हा प्रादुर्भाव घटता असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. जनावरांचा मृत्यू होत असल्यामुळे पशुपालक अस्वस्थ तर आहेतच पण मोठ्या आर्थिक नुकसानीलाही त्यांना सामोरे जावे लागू लागले आहे. (Lumpy: Four cows died in a single day in Solapur district) शासन आणि प्रशासन लंपीच्या विरोधात लढत असून लवकरच यात यश येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घेणे याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. 


सोलापूर जिल्ह्यात काल शुक्रवारी एकाच दिवसात चार गाई लम्पी प्रादुर्भावाने मृत्युमुखी पडल्या असल्याची माहिती आज पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत लम्पीमुळे १७ जनावरांचा मृत्यू झाला आहे तर यात दहा गाई आणि सात बैल यांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील हे आकडे आहेत . पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी येथे एक गाय दगावली आहे  तर माढा तालुक्यातील चौबे पिंपरी गावात एका बैलाचा मृत्यू झाला आहे. 


माळशिरस तालुक्यात तीन गाई आणि एक बैल मृत्युमुखी पडला असून तिरवंडी, कचरेवाडी, शिंदेवाडी येथील ही जनावरे आहेत. सांगोला तालुक्यात पाच गाईंचा मृत्यू झाला असून महूद, धायटी, शिवणे, वाढेगाव, मिसाळवाडी येथील प्रत्येकी एक गाई मृत झाली आहे. करमाळा तालुक्यात सावडी आणि राजुरी येथे प्रत्येकी एक अशा दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात चार जनावरे दगावली  असून बसवेश्वर - देगाव येथे एक गाय, तर कवठे, बेलाटी आणि बैल देगाव येथे प्रत्येकी एका बैलाचा मृत्यू झाला आहे. 


लसीकरण करा !

पशुपालकानी घाबरून जाऊ नये आणि आपल्या जनावरांना अशी लक्षणे दिसून येत असतील तर त्वरित पशु वैद्यकीय दवाखान्यात दाखवावीत त्याचबरोबर जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.     

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !