शोध न्यूज : पावसाळ्याचे दिवस संपत आले असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याला पावसाने मोठा तडाखा दिला असून ढगफुटी सदृश्य पाउस झाल्याने दाणादाण उडवून दिली आहे.
यावर्षीचा मान्सून आता परतीच्या मार्गावर आहे, येत्या काही दिवसात पाऊस निरोप घेईल अशी परिस्थिती असल्याने आता झाला तरी फारसा पाऊस होणार नाही असे वाटत असताना माढा तालुक्यात मात्र अचानक या पावसाने धिंगाणा घातला असून यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे माढा तालुक्यात केवळ पाणी आणि पाणीच झाले असून काही महत्वाचे रस्ते देखील बंद पडले आहेत. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन देखील अस्ताव्यस्त झाले आहे. काही भागातील रस्ते पावसाच्या पाण्याने बंद झाले असून ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बेंद ओढा तुडुंब भरून वाहू लागला असून निमगाव - ढवळस या रस्त्यावरील वाहतूक देखील बंद पडली आहे.
प्रचंड पाऊस झाल्यामुळे रानात पाणीच पाणी झाले असून ढवळस, पिंपरी,जाखले भोगेवाडी या गावांच्या परिसरात अधिक पाऊस झाला आहे. शेताच्या ताली फुटल्या असून नालाबंडिंग देखील फुटले आहेत. जाखले चोभे पिंपरी गावाच्या शिवेवर असलेला पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिके देखील वाहून गेली आहेत तर बेंद ओढ्यावरील पूल देखील वाहून गेला आहे. त्यामुळे काही गावांचे मार्ग बंद झाले आहेत. एवढा मोठा धिंगाणा या अचानक आलेल्या पावसाने माढा तालुक्यात घातलेला आहे. ढवळस येथील रेल्वेच्या गेट ३५ वर नवीन गेट खालून बोगदा करून तयार केलेला रस्ता बंद पडला असून येथील पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे येथे सहा फुट पाणी भरले आहे.
माढा तालुक्यासोबतच लगत असलेल्या करमाळा तालुक्यातील काही गावांना देखील या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. केम, पाथर्डी, मलवडी या गावाच्या परिसरात अतिवृष्टी झाली असून आजूबाजूच्या दहा गावांशी असलेला केम चा संपर्क तुटला आहे. केम येथील जिल्हा परिषद शाळा तसेच महाविद्यालय, हायस्कूल यांना सुट्टी देण्यात आली आहे. (Heavy rain in Madha taluka, loss to farmers) पावसामुळे केवळ शेती आणि पिकांचेच नुकसान झाले नाही तर विविध दुकानातील मालाचे देखील भिजून नुकसान झाले आहे. कृषी केंद्रातील खते, किराणा दुकानातील किराणा माल देखील भिजला गेला आहे. एवढेच नव्हे तर काही जनावरे देखील वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !