शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला असून सहा ते सात पोलीस जखमी झाले आहेत.
सोलापूर शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाच्या वाहनास टेंभुर्णीजवळ शिराळ पाटी परिसरात हा अपघात झाला असून कर्तव्यावरील पोलीस कर्मचारी या अपघातात जखमी झाले आहेत. टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस वाहन आणि एक आयशर टेंपो यांच्यात हा अपघात झाला आहे. सोलापूर शहर पोलिसांचे बॉम्बशोधक पथकाचे वाहन राष्ट्रीय महामार्गावरून निघालेले असताना एका आयशर टेंपोने पोलिसांच्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे पोलिसांचे वाहन उलटले आणि या वाहनात असलेल्या सहा पोलीस कर्मचाऱ्यांना मार लागला. या अपघातात सहा पोलीस जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
सोलापूर शहर पोलिसांचे बॉम्ब शोधक पथकाचे वाहन (एम एच १३ सी यु ०७३३) पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जात होते. या वाहनाच्या पाठीमागून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या आयशर टेंपोने (एम एच ४३ बीपी ९५५१) पोलिसांच्या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. यात पोलिसांसह श्वान देखील जखमी झाले आहे. पोलीस नाईक प्रवीण चंद्रकांत चुंगे, रोहित प्रकाश शिंदे, मंगेश राघोबा रोकडे, अंकुश विनायक सावंत, अमोल महादेव बांदल, सुदर्शन सुभाष गवळी हे पोलीस कर्मचारी जखमी झाल्याने त्यांना टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना मदत केली. (Police vehicle accident on Solapur-Pune highway) या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती परंतु पोलिसांनी काही वेळेतच ही वाहतूक सुरळीत केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !