BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ ऑक्टो, २०२२

मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याबाबत धमकी देणाऱ्याला ठोकल्या बेड्या !


शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून या प्रकारचे कारण पोलीसाना मिळाले आहे. सदर व्यक्तीने चक्क खोटेपणाने हा सगळा प्रकार करून राज्यातील पोलीस यंत्रणेला कामाला लावण्याचा नाहक उद्योग केला होता. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्वी नक्षलवादी गटाकडून धमक्या आलेल्या आहेत. आणि आता पुन्हा त्यांना ही एक वेगळी धमकी आली आणि यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. मुख्यमंत्री यांना पुरेशी सुरक्षा आधीच असते परंतु धमकीच्या या नव्या प्रकारामुळे यंत्रणा अधिकच दक्ष झाली आणि धमकीच्या मागे कोण आहे याचा तपास जलदगतीने सुरु करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोटातून उडवून देण्याचा कट रचला जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र 'आपण असल्या धमक्यांना भीक घालत नाही' असे म्हटले होते. सुरक्षा यंत्रणांची मात्र या फोनने झोप उडवली होती. 


फोन करून धमकी देणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अत्यंत जलद गतीने पकडले आहे. सदर व्यक्तीने पोलिसांना फोन करून नंतर मात्र आपला मोबाईल बंद करून ठेवला होता त्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढीला लागले होते आणि सर्वप्रथम फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे महत्वाचे होते. अखेर पोलिसांनी या व्यक्तीला पकडून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. लोणावळा पोलिसांनी तपास करीत या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अजय वाघमारे याने पोलिसांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असून तसा कट शिजत असल्याची माहिती दिली होती. हे करण्यामागचे कारण अगदीच अजब असल्याचे समोर आले आहे. 


सदर अजय वाघमारे हा आटपाडी येथील रहिवासी असून तो मुंबईला निघाला होता.  जाताना लोणावळा येथील ढाब्यावर जेवण करण्यासाठी थांबला होता. यावेळी ढाबा चालकाने त्याला दहा रुपयांची पाण्याची बाटली पंधरा रुपयाला दिली त्यामुळे तो संतापला होता. याबाबत त्याने हॉटेल चालकाला विचारले असता हॉटेल चालकाने "परवडत नसेल तर दुसरीकडे जा" असे उत्तर दिले होते त्याचा राग त्याला आला होता. हॉटेल चालकाला अद्दल घडावी, त्याला त्रास व्हावा या उद्देशाने वाघमारे याने अशा प्रकारचा फोन केल्याची माहिती वाघमारे यानेच पोलिसांना दिली आहे. 


हॉटेल चालकाला अद्दल घडवावी, पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागावा यासाठी त्याने पोलिसांना फोन केला आणि या हॉटेलमध्ये मुख्यमंत्री यांना ठार करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती त्याने दिली. (Arrested for threatening to attack Chief Minister) अशी माहिती मिळाल्यावर पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला करण्याचा खोटा कट रचला जात असल्याची खोटी माहिती दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


अजय वाघमारे याने नशेत हे कृत्य केले असल्याचेही सांगण्यात येत आहे. हॉटेल चालकावरील राग काढण्यासाठी आणि दहा रुपयाची बाटली पंधरा रुपयांना घ्यावी लागल्याच्या रागातून त्याने एवढे मोठे धाडस केले आणि  राज्यभरातील यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांच्यापुढे या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. सरकारी यंत्रणेवर ताण टाकून, महाराष्ट्राची झोप उडवून अजय वाघमारे मात्र शांत झोपला होता. शेवटी पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि सत्य समोर आले तेंव्हा सगळ्यांच सुटकेचा निश्वास टाकला.    

 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !