शोध न्यूज : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना हातात तुणतुणे घ्यावे लागेल आणि 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' असं म्हणत गावोगावी फिरावं लागेल अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी यांनी केली आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गट बाहेर पडून गुवाहाटीला गेल्यापासून सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे बंडखोरीपेक्षाही अधिक चर्चेत आले. 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, ओक्के' हा त्यांचा फोनवरील संवाद व्हायरल झाला आणि एका रात्रीत शहाजीबापूंना मोठी प्रसिद्धी मिळाली. एरवी सांगोल्याच्या पलीकडे फारसे चर्चेत नसलेले शहाजीबापू यांच्या 'काय झाडी, काय डोंगार' वर गाणी देखील आली आणि राज्यात हा संवाद अन्य विषयासाठी देखील वापरला जाऊ लागला आहे. उच्च शिक्षित असलेले शहाजीबापू आपल्या मानदेशी शैलीत सभा देखील गाजवत असतात आणि या बंडात त्यांचे नाव अग्रभागी गाजले. बापू जेवढे गाजत राहिले तेवढे टीकेचेही धनी ते होत राहिले आहेत. तमाशातील सोंगाड्यापासून जॉनी लिव्हर यांच्यापर्यंत अनेकांचा उल्लेख या विषयात झाला आहे.
शिवसेनेतून बंद करून चाळीस आमदार बाहेर पडले पण शिवसेनेच्या 'टार्गेट' वर असलेल्या मोजक्या काही आमदारांत शहाजीबापू पाटील हे अग्रभागी आहेत. आ. पाटील हे उद्धव ठाकरे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत सर्वांवरच टीका करीत आहेत त्यामुळे शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्याही निशाण्यावर ते आहेत. असे असतानाच आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. आ. पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. अजित पवार यांना आता काही काम उरलेले नसून त्यांनी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ऐकत बसावे' असे आ. पाटील यांनी म्हटले आणि यावर सचिन खरात यांनी बापूंवर कडक शब्दात टीका केली आहे.
"आमदार शहाजीबापू यांना गुवाहाटीपासून मुंबईपर्यंत 'नाच्या' अशी ओळख मिळाली आहे. शहाजीबापू, तुम्ही नाच्या म्हणून प्रसिद्ध झाला आहात आणि म्हणूनच शिंदे गट तुम्हाला नाच्या म्हणूनच प्रत्येक सभेत बोलावत असतो हे तुम्हालाही माहित आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व तुम्ही करता, तुम्ही आता नाच्या म्हणून प्रसिद्ध झाल्याने सांगोल्याची जनता लवकरच तुम्हाला घरी बसवणार आहे". असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे.(Criticism again on MLA Shahajibapu Patil) "मतदार संघातील जनतेची कामे करण्याऐवजी तुम्ही नाच्या म्हणून राज्यभर फिरत आहात, जनतेने तुम्हाला घरी बसविल्यानंतर हातात तुणतुणे घेवून "कशी नशिबानं थट्टा आज मांडली" असे म्हणत गावोगावी फिरावे लागणार आहे" अशी टीकाही खरात यांनी केली आहे.
शहजीबापुंचे टोले !
शिवसेनेवर टीका करायची एकही संधी शहाजीबापू पाटील सोडत नसून त्यांनी आजही चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेकांवर टीका केली आहे. बंडखोरी केलेल्या चाळीस आमदारांपैकी ३९ आमदार निवडणुकीत पडणार असल्याचे विधान नुकतेच शिवसेनेचे जेष्ठ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले होते. त्यावर बोलताना बापू म्हणाले, "एक वर्षानंतर चंद्रकांत खैरे यांना भेटायला हिमालयातच जावे लागेल, रिझर्वेशन कसे करायचे हे मला अजून कळलेले नाही पण दिल्लीत कुठेतरी जाऊन गुहा बुक कारवाई लागले"! अरविंद सावंत, विनायक राउत, संजय राऊत यांनीच शिवसनेचे वाटोळे केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !