BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ ऑक्टो, २०२२

सलग दुसरा अपघात. दोन तरुण भाविकांचा बळी !

 


शोध न्यूज : सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर सलग दुसरा अपघात होऊन दोन तरुणांचे बळी गेल्यामुळे भाविकांची सुरक्षा पुरती धोक्यात आल्याचे दिसू लागले आहे.

नवरात्र आणि दसरा यानिमित्त तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्याऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविक दर्शनासाठी शक्य त्या वाहनाने आणि पायी चालत तुळजापूरला जात असतात. सद्या तुळजापूर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असताना भाविकांचे प्राण धोक्यात येताना दिसत आहेत. शनिवारीच आपल्या आई आणि बहिणीला दुचाकीवरून घेवून निघालेल्या १७ वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आणि आई, बहिण हे जखमी झाले. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होता असतानाच दुसरा एक अपघात झाला आणि त्यानंतर मात्र चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वाळू वाहतूक करणारा हायवा टिप्पर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले आहेत.

सोलापूर येथील बावीस वर्षाचा रवींद्र नागनाथ अलशेट्टी आणि चोवीस वर्षाचा तरुण व्यंकटसाई सूर्यप्रकाश कत्ती हे दोघे एका दुचाकीवरून तुळजापूर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना टिप्परच्या धडकेने अपघात झाला आणि सोलापूर येथील कुंभारी वेस येथे राहणारे हे दोन्ही तरुण या अपघातात मृत्युमुखी पडले. अपघाताची भीषणता फारच मोठी असल्याचे दिसत होते. (Accident on Solapur Tuljapur road, two killed) दोन्ही तरुण उडून दूर जाऊन पडले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांचे मृतदेह पहावत नव्हते. दुचाकी एकीकडे आणि मृतदेह दूरवर अस्ताव्यस्त अवस्थेत पडले. काळीज गोठविणारे आणि मन हेलावणारे हे दृश्य रस्त्यावर अनेकांनी पाहिले. अपघात होताच येथे मोठी गर्दीही झाली होती.

अपघात आणि बघ्यांची गर्दी यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. तुळजापूर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अपघात होण्याची ही सलग दुसरी घटना असून यामुळे भाविकांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. तुळजापूरला दर्शनास जाणाऱ्या भाविकांची गर्दी आणखी वाढणारच असून अशा प्रकारे अपघात होऊ लागले असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. वाळूच्या टिप्परने हा अपघात केला असून वाळू वाहतूक करणारी वाहने ही सतत भरधाव आणि अत्यंत बेफिकीरपणे धावत असतात. यावर कुणाचेही नियंत्रण नसते हे या आधीची स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने सोलापूर - तुळजापूर मार्गावर काही दिवस तरी अशी वाहने जाण्यास प्रतिबंध करावा अशी मागणीही आता पुढे येवू लागली आहे.

अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !