BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

बदनामी होण्याच्या भीतीने तरुणाने घेतला गळफास !


शोध न्यूज : पोलिसांकडे तक्रार केली जाण्याच्या भीतीने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे घडली असून आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. 


पाटकूल येथील प्रतिक अनिल सवणे असे आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने बंद खोलीत लाकडी सराला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एका अज्ञात तरुणीने मोबाईलवरून मेसेज पाठवून  खात्यातून ३७ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली आणि पोलीस स्टेशनला तक्रार करीन अशी भीती दाखविली गेल्याने या तरुणाने गळफास घेवून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची ही घटना आहे.  प्रतिक हा एकुलता एक मुलगा असल्याचे सवणे कुटुंबाला हा फार मोठा धक्का बसला आहे. (Youth commits suicide due to fear of infamy)अलीकडे मोबाईलवर असे मेसेज येतात आणि नंतर व्हिडीओ कॉल केले जातात. त्यानंतर व्हिडीओ तयार करून बदनामीची धमकी देत पैसे उकळण्याचे अनेक प्रकार घडत असतात. अशाच घटनेने प्रतीकचा बळी घेतला आहे.   


प्रतिकच्या मोबाईलवर एका मुलीचा हाय असा मेसेज आला आणि त्यानंतर प्रतीकाने या मुलीला फोन केला. यावेळी या तरुणीने आपण एक व्हिडीओ तयार करू असे सांगितले. व्हिडीओ यु ट्यूबवर व्हायरल करीन अशी धमकी या तरुणीने प्रतीकला दिली आणि तसे न  करण्यासाठी पैशाची मागणी केली. व्हिडीओ व्हायरल होऊन बदनामी होऊ नये म्हणून प्रतीकने घाबरून या तरुणीला ३७ हजार रुपयांची रक्कम पाठवली परंतु प्रतिक या घटनेने निराश झाला होता. आपली बदनामी होऊ शकते या निराशेतून त्याने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एका चिट्ठीत सदर घटना लिहून ठेवली शिवाय 'सर्वाना माझा नमस्कार' असे म्हणून त्याने गळफास घेवून आपल्या जीवनाचा शेवट केला. प्रतिक प्रतिसाद देत नसल्याचे पाहून दरवाजा तोडण्यात आला आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रकार समोर आला.  त्याचे दोन्ही पाय लुंगीने बांधलेल्या अवस्थेत होते तर तो लटकत होता. त्याच्या कमरेला एक चिट्ठी आढळून आली असून ती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !