BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ सप्टें, २०२२

चाळीस माणसाना दिलं चक्क जनावरांचे इंजेक्शन !

 


शोध न्यूज : बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट थांबायचे नाव घेत नसताना अशा एका डॉक्टरने चाळीस माणसाना थेट जनावरांचे इंजेक्शन दिल्याची खळबळजनक घटना प्रकाशात आली आहे. यामुळे अनेक रुग्ण धास्तावून गेले आहेत. 


डॉक्टरना परमेश्वराचे दुसरे रुप मानले जाते. जीवनात अशी वेळ अनेकदा येते की प्राण वाचवणारा डॉक्टर असतो आणि त्यांचे हात टेकले की परमेश्वर आठवत असतो. डॉक्टरांवर प्रचंड श्रद्धा, विश्वास असतो, अर्थात काही गल्लाभरू डॉक्टर हे केवळ रुग्णांना लुटण्यासाठी डॉक्टर असतात. असे असले तरी रुग्णांचा विश्वास मात्र डॉक्टरांवर असतो. अशा विश्वासाचा गैरफायदा उठवत अनेक भामटे कसलीही पदवी नसताना डॉक्टर म्हणून समाजात मिरवतात आणि रुग्णांवर उपचार करीत आपला गल्ला भरण्याचे काम करतात. अनेक मोठे हॉस्पिटल देखील अशा बोगस डॉक्टरांनी उभारलेले असल्याचे या आधीच समोर आले आहे. राज्याच्या कोनाकोपऱ्यात असे बोगस डॉक्टर कार्यरत असतात आणि रुग्णाचे प्राण संकटात असतात. नगर जिल्ह्यातील अशा एका 'डॉक्टरांचा' धक्कादायक प्रताप समोर आला असून याने माणसाना थेट जनावरांचे इंजेक्शन दिले आहे. 


मूळ बीड जिल्ह्यातील आदेशपुरा येथील रहिवासी असलेल्या सदाशिव जवंजळे या बोगस डॉक्टरने पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथे हा अजब प्रकार केल्याचे उघडकीस आहे. दोनच दिवसापूर्वी हा डॉक्टर गावात आला होता आणि येथे रुग्णांवर उपचार करीत होता. पाठीचे, मानेचे आणि गुडघ्याच्या दुखण्यावर हा उपचार करीत होता. जेथे वेदना आहेत त्याच ठिकाणी तो रुग्णाला इंजेक्शन देत होता. पाचशे रुपयात तो रुग्णांवर उपचार करीत होता आणि अनेक रुग्णांनी त्याच्याकडून उपचार करून घेतले. काही जिज्ञासू लोकांना डॉक्टराबाबत शंका आली आणि त्यांनी डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चित्रे दिसून आली त्यामुळे हा संशय अधिकच वाढला. 


जनावरांची चित्रे असलेली औषधे माणसांना कशी दिली जातील ? हा प्रश्न गावातील काही जिज्ञासू मंडळींना पडला. त्यांनी करंजी येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी दिलीप तांदळे याना या ठिकाणी बोलावून घेतले. तांदळे तेथे आले आणि त्यांनी या डॉक्टरांच्या बागेतील औषधांची तपासणी केली. या डॉक्टरला घेऊन ते तिसगाव आरोग्य उपकेंद्रात गेले. तेथे त्याच्याजवळील सर्व औषधांची पाहणी आणि तपासणी केली असता ही औषधे माणसांना देण्याची नसून जनावरांना देण्याची आहेत हे सिद्ध झाले. जनावरांना दिल्या जाणाऱ्या औषधांचा वापर माणसांसाठी केला असल्याचेही समोर आले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली तर ज्यांनी हे इंजेक्शन घेतले असे रुग्ण धास्तावले. 


सदर बोगस डॉक्टरच्या जवळ असलेल्या औषधांचा पंचनामा करण्यात आला आणि त्याला पाथर्डी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. तिसगाव येथील डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदाशिव जवंजळे या बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. गावातील चाळीस रुग्णांना त्याने जनावरांची इंजेक्शन टोचली असल्याचे निदर्शनास आले असून हे रुग्ण प्रचंड धास्तावले आहेत. (A bogus doctor gave injections of animals to humans) जनावरांना देण्याची इंजेक्शन आपल्याला टोचली गेली असल्याची माहिती  मिळाल्यानंतर सगळेच रुग्ण हादरले आहेत. पाचशे रुपयातील उपचार त्यांना भलत्याच चिंतेत घेऊन गेले आहेत. 


कमिशनवर निमंत्रण !

गावातील व्यक्तीनेच या डॉक्टरला बोलावून घेतले होते आणि हा बोगस डॉक्टर बिनधास्तपणे रुग्णांना इंजेक्शन टोचत होता, प्रत्येकाकडून पाचशे रुपये घेत होता. बीड जिल्हयातील हा बोगस डॉक्टर खंडोबावाडी येथे कसा पोहोचला? याबाबत प्रश्न उपस्थित झाला असून गावातील एका व्यक्तीने त्याला बोलावून घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. हा बोगस डॉक्टर या व्यक्तीला दरदिवशी एक हजाराचे कमिशन देत होता अशी माहितीही पुढे येऊ लागली आहे.  


हे तर यमदूत !

बोगस डॉक्टर म्हणजे यमदूत ठरत असून रुग्णाचे प्राण यांच्यामुळे धोक्यात येतात. आजवर काही बोगस डॉक्टरांनी केलेल्या उपचारात रुग्ण दगावलेले आहेत. प्रशासन काही काळापुरते अशा बोगस डॉक्टरांचा शोध घेत कारवाईही करते परंतु तरीही असे यमदूत राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात आढळून येतात. त्यामुळे रुग्णांनी उपचार घेताना योग्य डॉक्टरांची निवड करणे आवश्यक असून कुठल्या अनोळखी, पोट आणि गल्लाभरू डॉक्टरपासून दूर राहणे हाच यावरील उत्तम  उपाय ठरणार आहे.


प्रशासनाने दक्ष राहावे ! 

ग्रामीण भागात अशा बोगस डॉक्टरांचा अधिक सुळसुळाट असतो. अशिक्षित जनतेला खरे आणि बोगस डॉक्टर यांच्यातील फरक कळत नाही त्यामुळे त्यांची फसवणूक होते आणि रुग्णांच्या प्राणाला देखील धोका संभवतो त्यामुळे प्रशासनाने मोहीम राबवून अशा डॉक्टरांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांना कुणाचे सहकार्य मिळते याचाही शोध आवश्यक बनला आहे.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !