BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यात तरुण गेला वाहून, नसते धाडस जीवावर बेतले !



शोध न्यूज : एका तरुणाने केलेले नसते धाडस जीवावर बेतले असून पूर आलेल्या भीमा नदीच्या पात्रात नसते धाडस करीत उडी घेतलेला तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला असून त्याचा शोध लागला नाही.


उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीच्या पात्रात येणारे पाणी वेगवान असते. या पावसाळ्यात काही वेळा उजनी धरणातून पाणी सोडावे लागले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे भीमा नदीला मोठा पूर येतो त्यामुळे पाणी सोडल्यापासूनच प्रशासन नदीकाठावरील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत असते. तरी देखील काही दुर्घटना घडतात परंतु या दुर्घटना ओढवून घेतल्या असल्याचेच दिसून येते. गोविदापुरा परिसरातील एका तरुणाने भीमा नदीच्या पुरात उडी घेतली आणि त्याचा मृतदेहाच हाती आला होता. सदर घटना ताजी असताना पंढरपूर तालुक्यात अशीच आणखी एक घटना घडली आहे.


पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील एक तरुण गजेंद्र उर्फ सज्जन संतोष गायकवाड हा भीमा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. या तरुणाने पिराची कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा पात्रात उडी मारली आणि तो पाण्याच्या प्रवाहासोबत वहात गेला आहे. सदर तरुण आणि त्याचा काका भारत रामचंद्र गायकवाड हे दोघे करकंब येथे गेले होते. तेथून परत येत असताना पिराची कुरोली येथे आल्यावर गजेंद्र याने बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात उडी घेतली. नदीच्या पात्राला वेग असल्याने तो पाण्यात पडताच वाहून गेला. या तरुणाने दारूच्या नशेत बंधाऱ्यावरून भीमा पात्रात उडी घेतल्याची चर्चाही सुरु झाली आहे. 



सदर घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी बंधाऱ्यावर मोठी गर्दी केली.  घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पाहणी केली. (The young man was swept away in the flood of Bhima river) स्थानिक नागरिक, मासेमारी करणारे लोक यांची मदत घेवून गजेंद्र याला शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला पण नदीतील मोठ्या प्रमाणातील प्रवाही आणि वेगवान पाणी यामुळे या तरुणाचा शोध लागला नाही. काही क्षण तो पाण्याचं भोवऱ्यात गोल गोल फिरत राहिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.


मासे घेण्यासाठी थांबले !

करकंब येथून धोंडेवाडीकडे परत येत असताना पिराची कुरोली बंधारा येथे आल्यावर ते मासे घेण्यासाठी थांबले. 'तुम्ही मासे घ्या, तोपर्यंत मी पोहून येतो' असे म्हणत गजेंद्र गायकवाड हा बंधाऱ्याकडे गेला. नदीला पाणी जास्त आहे, पाण्यात जाऊ नको असे देखील त्याला चुलत्याने सांगितले पण आपल्याला पोहता येते असे सांगून तो पुढे गेला. अखेर कठड्यावरून त्याने पुरात उडी घेतली पण तो पाण्यातील बोहऱ्यात अडकला आणि त्याला बाहेर येता आलेच नाही. त्यानंतर तो वाहून गेला असे उपस्थित असलेले लोक सांगत आहेत.    


सुट्टीसाठी आला आणि --

एकवीस वर्षाचा गजेंद्र हा गुजरात राज्यात एका सोन्या चांदीच्या दुकानात नोकरीस होता. अलीकडेच तो आपल्या गावी परत आला होता. सोमवारी पुन्हा परत गुजरातला जाण्याचे त्याचे नियोजन होते परंतु तसे काहीच घडले नाही. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून मित्रपरिवारात देखील शोकाकुल वातावरण आहे. 



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !