शोध न्यूज : कुणाच्या तरी बेपर्वाईने इतर कुणा निष्पापाचा जीव जात असल्याचे दर्शविणारा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ बरेच काही सांगून जात आहे.
रस्त्यावर वाहन घेवून जाताना रस्त्यावर दुसरेही कुणी येत जात असते याचे भान अनेकांना नसते. रस्ता केवळ आपल्याच पिताश्रींच्या मालकीचा असल्याच्या अविर्भावात अनेकजण वावरत असतात आणि इतरांचा जीव घेवून मोकळे होत असतात. रस्त्यावर कुठेही कशाही गाड्या उभ्या केलेल्या दिसतात तसेच वाहतुकीचे नियम सर्रास पायदळी तुडवले जातात. रस्त्यावरून वळताना पुढून मागून येणाऱ्यासाठी काहीच इशारे न करता बिनधास्त वाहने वळवतात आणि यातच चूक नसलेल्या व्यक्तीला जीवाला मुकावे लागते. एका चालकाच्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागते. अत्यंत सध्या वाटणाऱ्या चुका या कुणाच्या तरी जीवावर उठताना दिसतात.
रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली जाते आणि आपल्याच नादात असलेला चालक गाडीचा दरवाजा उघडतो. पाठीमागून कुणी येते आहे का याकडे लक्ष दिले जात नाही आणि मग अनर्थ घडतो. असाच हा एक व्हिडीओ व्हायरल होत असून एका चालकाची बेपर्वाई दुचाकीवरील दोघांच्या जीवावर उठते. मागचा अंदाज न घेता कारचा दरवाजा उघडला जातो आणि पाठीमागून येणारे दुचाकी चालक दरवाजाला धडकू नये म्हणून तो चुकविण्याचा प्रयत्न करतात. नेमके याचवेळी समोरून एक ट्रक येतो. दरवाजा चुकविण्याच्या नादात दुचाकीस्वार ट्रकच्या बाजूने जातात आणि जे घडते ते पाहून काळजाचा ठोका तर चुकतोच पण हे दृश्य पाहवत देखील नाही.
रस्त्यावरून जाताना किती काळजी घ्यावी याचा एक मोठा धडाच ही घटना दाखवत आहे. ज्यांची चूक नाही त्यांचे जीव धोक्यात येतात आणि ज्याची खरी चूक आहे त्याच्यावर मात्र कसलाच परिणाम होत नाही. रस्त्यावर उभी असलेल्या कारचा चालक दरवाजा उघडू लागतो आणि दुचाकीवरील दोघांचा जीव संकटात येतो. (Viral video of horrific accident, two lives in danger) या घटनेतून धडा घेण्यासाठी पोलिसांनी हा एक जुना पण बोलका व्हिडीओ शेअर केला असून "कृपया तुम्ही तुमच्या वाहनाचे दरवाजे उघडत असताना सावध रहा आणि प्राणघातक अपघात टाळा." असा संदेशही त्यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !