BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यातही भगरीतून विषबाधा झाल्याचा धसका !

 



शोध न्यूज : राज्यात अनेक ठिकाणी भगरीतून विषबाधा झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पंढरपूर तालुक्यात झालेल्या विषबाधेच्या प्रकाराने अनेकांनी धसका घेतला असल्याचे दिसत आहे. 


नवरात्र उत्सव सद्या सुरु असून या दिवसात महिला आणि पुरुषही उपवास करतात. उपवासासाठी साबुदाणा, भगर खाल्ली जाते, सलग उपवास असल्यामुळे नवरात्रीच्या काळात भगरीलाच अधिक पसंती दिली जाते पण ही भगर धोक्याची ठरत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता आणि भगर खाणारे अनेक लोक रुग्णालयात जाऊन पडले होते. त्यावेळी देखील भगरीचा वेगळा प्रताप समोर आला होता आणि आता यावर्षीही असे धक्कादायक प्रकार घडू लागले असून शेकड्यांवर लोक विषबाधेने त्रस्त झाले आहेत. उपवासाची भगर लोकांच्या जीवावर उठली असल्याचे चित्र समोर आले आहे. राज्याच्या काही भागात हा प्रकार अधिक तीव्र स्वरुपात आढळून आला असून अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे.


राज्याच्या विविध भागातील हे प्रकार समोर येत असतानाच पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे देखील असाच धक्कादायक प्रकार आढळून आला आणि या एका गावातील तब्बल ४२ लोकांना भगरीतून विषबाधा झाल्याची बाब समोर आल्याने ऐन नवरात्रीत खळबळ उडाली आहे. मेंढापूर येथील ग्रामस्थांनी नवरात्री उपवासासाठी भगर पीठाचा आहार घेतला आणि  त्यानंतर त्यांना उलट्या, जुलाब, मळमळ, चक्कर असा त्रास होऊ लागला. या सर्वांवर पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने एकही रुग्णाची प्रकृती अधिक बिघडली नाही म्हणून मोठा अनर्थ टळला आहे. 


मेंढापूर येथे विषबाधेचा त्रास झालेल्यांनी पंढरपूर येथील दुकानातून भगर पीठ खरेदी केले होते. त्यातून ४२ जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर अन्न औषध प्रशासनाने या दुकानातून भगर पीठ ताब्यात घेतले आहे. एकूण १२५ किलो पिठाची विक्री करण्यात आली होती आणि दुकानातील १८१ किलो भगर पीठ प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. विषबाधा झालेल्या कुटुंबाच्या घरातील पीठाचे नमुने देखील घेण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. या गावातील ज्यांच्याकडे हे पीठ शिल्लक आहे त्यांनी ते वापरू नये अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत. 


पंढरपूर येथून तालुक्यातील विविध गावात किराणा साहित्य पोहोचत असते आणि प्रत्येक गावात नवरात्रीनिमित्त उपवास केला जातो. या उपवासात भगर हमखास वापरली जाते. (Poisoning by Bhagar in Pandharpur Taluka)असे असताना तालुक्यातील एकाच गावात असा प्रकार कसा होऊ शकतो हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तालुक्यातील अनेक गावात आणि पंढरपूर शहरात भगर विक्री झाली असेल परंतु मेंधापुर या एकाच गावात विषबाधेचा प्रकार कसा घडला याचे एक कोडे असले तरी या घटनेने ग्रामीण भागात देखील अनेकांनी धसका घेतला असल्याचे दिसत आहे. भगरीचे पीठ विकत आणण्यापेक्षा घरीच भगर दळून पीठ उपलब्ध करण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे. 


पुढे काय ....? 

संबधिंत व्यापाऱ्यावर कारवाई होणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भगर पीठ स्वस्त मिळू लागल्याने ग्राहक ते पीठ घेत आहे.  भगरीच्या दरापेक्षा पिठाचा दर काही ठिकाणी कमी आहे परंतु कमी दरात विकणे कसे परवडते ? या पीठात काही भेसळ आहे काय ? याची प्रामाणिक तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !