BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

'ते' आमदार आता राष्ट्रवादीच्या संपर्कात !

 


शोध न्यूज : राज्याच्या राजकारणात उठलेले बंडखोरीचे वादळ काही केल्या थांबताना दिसत नसून आता शिंदे गटातील बारा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.


शिवसेनेतून चाळीस आमदार फुटले आणि स्वतंत्र गट म्हणत भाजपशी जवळीक साधली आणि सरकार देखील स्थापन झाले. सुरुवातीला यातील अनेक आमदार परत येतील असा दावा शिवसेनेकडून केला जात होता परंतु अजूनतरी तसे काहीच घडले नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील काही आमदार नाराज आहेत अशा बातम्या येत राहिल्या आणि मंत्रीमंडळ विस्तार झाल्यावर ही शक्यता अधिक गडद झाली. मंत्रीमंडळात संधी मिळेल असे वाटत असलेल्या काही मंत्र्यांना मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे त्यांची नाराजी निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येऊ लागले. काही आमदारांनी पडद्याआडून का होईना आपली नाराजी व्यक्त केली आहे तर बच्चू कडू यांनी थेट इशारा देवून टाकला आहे. बाकी आमदारांत देखील अंतर्गत खदखद असल्याचे सतत सांगितले जात आहे.

 
बच्चू कडू तसेच अन्य काही मंत्र्यांना दुसऱ्या विस्तारत मंत्रीपद दिले जाईल असे सांगून तात्पुरते का होईना थंड करण्यात आले होते परंतु ही खदखद पुन्हा बाहेर येण्याची परिस्थिती तयार होऊ लागली आहे. महिनाभरात दुसरा मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येईल असे आधी सांगितले होते, त्यानंतर गणेशोत्सव होताच हा विस्तार केला जाईल असे सांगण्यात आले पण हा विस्तार आता पुन्हा लांबणीवर पडला आहे. आता दिवाळीपूर्वी हा विस्तार केला जाईल असे सांगितले जाऊ लागले आहे. दुसऱ्या विस्तारत संधी न मिळालेले आमदार पुन्हा वेगळ्या वाटेने जाण्याची भीती असल्यामुळे हा विस्तार असाच लांबत राहणार अशी शक्यता राजकीय जाणकारांनी आधीच व्यक्त केली होती आणि आता तसेच घडताना दिसत आहे. 


दरम्यान शिवसेनेचे जेष्ठ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटातील दहा पंधरा आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली. त्यावर बरीच चर्चा झालेली असतानाच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील बारा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून ते सरकार सोडून राष्ट्रवादीत येण्याच्या मनस्थितीत असल्याचा दावा आ. मिटकरी (Mla Amol Mitakari) यांनी केला आहे. मिटकरी यांनी हा दावा करताच पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाराज आमदार शिवसेनेत परतू शकतात अशी चर्चा सुरु असताना हे आमदार राष्ट्रवादीच्याच संपर्कात असल्याचा हा वेगळाच दावा पुढे आला आहे.

 
मंत्रीमंडळाचा विस्तार होत नाही आणि जेंव्हा होईल तेंव्हाही आम्हाला मंत्रीपद मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही शिंदे फडणवीस सरकार सोडून येण्याच्या मनस्थितीत आहोत असे म्हणत हे आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. असे एकूण बारा आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात आले आहेत असे मिटकरी यांनी सांगितले (Twelve MLAs from Shinde group in touch with NCP) असून त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही हवाला दिला आहे परंतु जयंत पाटील यांनी मात्र यावर काही भाष्य केले नाही. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !