BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ सप्टें, २०२२

आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर युवसेनेचा आक्रमक हल्लाबोल !




शोध न्यूज : प्रसिद्धी मिळतेय म्हणून आ. शहाजीबापू पाटील यांनी आपली डायलॉगबाजी सुरूच ठेवली खरी, पण आता सोलापूर जिल्ह्यातच शिवसेना त्यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेऊ लागली असून कधी नव्हे एवढ्या वाईट भाषेत बापूवर प्रहार होताना दिसू लागले आहेत. 


एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील चाळीस आमदार फुटून गेले, त्यापाठोपाठ बारा खासदार देखील शिंदे गटात दाखल झाले. कधी नव्हे एवढे मोठे बंड राज्याच्या राजकारणात झाले परंतु सांगोला येथील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील हेच अधिक चर्चेत राहिले. "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ..... ओक्के" या त्यांच्या व्हायरल संवादामुळे ते अधिकच चर्चेत आले तसे शिवसेनेचे ते टार्गेट देखील ठरले. बंडखोर चाळीस आमदारात एकटे शहाजीबापूच शिवसेनेवर अधिक टोकाची टीका करीत राहिले आणि आव्हाने देत राहिले. त्यांना राज्यात प्रसिद्धी मिळाली पण आता हेच बुमरँग ठरताना दिसत आहे. 


आ. शहाजीबापू हे सततच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्याने शिवसेना आता केवळ संतापली नाही तर ती भडकल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात हे वातावरण अधिक उग्र दिसू लागले असून आज युवा सेनेने माळशिरस तालुक्यातील संगम येथे रास्ता रोको आंदोलन करून शहाजीबापू यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. बापूकडून सतत टीका होता असताना त्यांनी ठाकरे पिता पुत्रांना 'सांगोल्यात येऊन रहावे, एक बंगला भाड्याने घेऊन देतो' असे नुकतेच म्हटले आहे आणि त्यावर युवा सेनेचा संताप अनावर झाला आहे. अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी आज आ. पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली. 


आंदोलन करताना 'संत्रा (देशी दारू) आमदार मुर्दाबाद', शहाजीबापू मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्याच पण गाढवावर उलटे बसलेले आ. शहाजीबापू आणि हातात देशी दारूची बाटली असे चित्र लावलेले बॅनर झळकावले जात होते. 'बिन अकलेचे गाढव' असा देखील उल्लेख करण्यात आला होता शिवाय 'पन्नास खोके, एकदम ओके' 'शिंदे गटाचे जॉनी लिव्हर' अशा सगळ्याच पद्धतीने युवा सेनेने जोरदार प्रहार केला आणि या आंदोलनाची सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात विकासाची बोंब असताना आ. शहाजीबापू राज्यभर कोरडी डायलॉगबाजी करीत सुटले आहेत अशी टीका युवासेनेचे गणेश इंगळे यांनी केला. 


अकलूज - टेंभुर्णी रस्त्यावर केलेल्या या आंदोलनावेळी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरीत आ.  पाटील यांचा निषेध व्यक्त केला. "बापू, तुमच्यासाठी नोकरी आहे, तुम्ही मातोश्री बंगल्यात कामाला या, तुमची शिफारस आम्ही सर्व शिवसैनिक मिळून उद्धव ठाकरे यांच्याकडे करू' असा टोलाही इंगळे यांनी लगावला आहे. 


'संत्रा' आमदार !

आंदोलनाच्या  दरम्यान युवा सेनेने 'संत्रा आमदार' (देशी दारू- संत्रा) इथपासून शिंदे गटातील जॉनी लिव्हर असा उल्लेख करीत टीका केली. महाराष्ट्राची करमणूक करण्याचा दौरा आता बंद करा असे म्हणत 'काय दारू, काय चखना, काय ते पन्नास खोके, समदं कसं ओक्के' अशा घोषणाही देण्यात येत होत्या.   


वहिनींसाठी लुगडेही पाठवू !

शहाजीबापू पाटील गुवाहाटी येथे गेले होते तेंव्हा त्यांनी आपल्या राजकारणावर बोलताना आपण किती आर्थिक अडचणीत आलो आहे हे सांगताना 'बायकोला लुगडं सुद्धा घेऊ शकत नाही' अशा प्रकारचे एक विधान केले होते. हाच धागा पकडून युवा सेनेने 'आता पन्नास खोके मिळालेत, त्यातून एक लुगडे घ्या' असे म्हटले. मातोश्रीवर कामाला राहिल्यावर तुम्ही लुगडं घ्या नाहीतर युवा सेनेच्या वतीने वहिनींसाठी लुगडे पाठवतो' अशी टीकाही युवा सेनेने केली आहे.  


करमणुकीच्याही पलीकडे ! 

राज्यातील राजकारण करमणूक करीत असल्याचे अनेकजण म्हणत होते, त्यात आ. शहाजीबापू पाटील यांच्या डॉयलॉग बाजीकडे विनोदाने पहिले जात होते पण आता हा सगळंच प्रकार करमणुकीच्या पलीकडे गेलेला दिसत आहे. आ. शहाजीबापू उत्तम वक्ते आहेत आणि त्यांच्या सभाही गाजत असतात पण त्यांनी सांगोल्याच्या पलीकडे जाऊन कधी कुणावर टीका केली नाही की मनेही दुखावली नाहीत. आता मात्र जे सुरु आहे त्याचे पडसाद अत्यंत टोकाला जाऊन उमटू लागले आहेत. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !