BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

पंढरपूर तालुक्यात बंद घरात पुन्हा एकदा चोरी !

 



शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यात पुन्हा एकदा घरफोडी झाली असून शिक्षकाचे घर फोडून एक लाख पाच हजाराचा ऐवज चोरट्यांनी संधी साधून चोरून नेला आहे त्यामुळे चोरांची दहशत पुन्हा एकदा ग्रामीण जनतेच्या मनावर दडपण आणू लागली आहे.


पंढरपूर शहर आणि उपनगरात सतत चोऱ्या होत असून तालुक्यातील स्थिती देखील काही फारशी वेगळी नाही. बंद असलेल्या घरावर नजर ठेवून रात्रीच्या वेळी त्या घरात चोरी होत असल्याच्याच घटना अधिक आहेत. कुठल्यातरी कामाच्या निमित्ताने नागरिकांना परगावी जावे लागते आणि घराची राखण केवळ एक कुलूप करीत असते. घराचा दरवाजा बंद आणि बाहेरून कुलूप असले की ते घर चोरट्यांच्या  नजरेत येते आणि रात्रीच्या वेळी संधी साधून या घरात चोरी होते. सद्या तर सणासुदीचे दिवस सुरु असून या काळात चोरांचे चांगलेच फावत असते आणि अशीच संधी साधून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे रात्रीच्या वेळी एका शिक्षकाचे घर फोडण्यात आले आहे. 


कासेगाव येथील शिक्षक सुभाष लक्ष्मण धोत्रे हे दाते अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला राहतात. महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्ताने ते सहकुटुंब सांगोल्यातील नातेवाईकाकडे गेले होते. घराला व्यवस्थित कुलूप लावून त्यांनी जाताना सर्व खबरदारी घेतलेली होती.  धोत्रे यांना सांगोल्यात असताना त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून 'तुमच्या घरातील लाईट सुरु आहे' अशी माहिती दिली. घरातील दिवे बंद करून, घर व्यवस्थित कुलूपबंद करून आल्याची त्यांची खात्री होती तरीही घरातील लाईट सुरु असल्याचे त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 


आपण घरात नसताना घरात काही अघटित घडल्याचा अंदाज त्यांना आला आणि ते रात्रीच सांगोला सोडून आपल्या घरी परतले. घरी येवून पाहतात तर घरातील दिवे सुरु असल्याचे दिसले आणि घराचे सेफ्टी लॉक आणि ग्रेनाइड यांची तोडफोड झाल्याचे दिसून आले. आपण घरात नसताना घरात चोरी झाली असल्याचे त्यांच्या सहज लक्षात आले. त्यांनी लगेच पंढरपूर तालुका पोलिसात धाव घेतली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख पंधरा हजार रुपयांची रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार ६२७ रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. (Theft in teacher's locked house in Pandharpur taluka) शिक्षक धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


बंद घरे 'टार्गेट' वर !

चोर बंद घरांना टार्गेट बनवत असल्याचे सातत्याने दिसून येते. कुलूप असलेल्या घरावर पाळत ठेवून, घरमालक परगावी गेल्याचा अंदाज घेत चोऱ्या होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी घराला  कुलूप लावून बाहेरगावी जाणे शक्यतो टाळण्याची गरज आहे.  चोरांना निमंत्रण मिळू नये यासाठी कुणीतरी घरी असणे आवश्यक बनले आहे. दरवाजाचे कुलूप या चोरांना निमंत्रण देताना दिसून येत असल्याने याबाबत नागरिकांनी काळजी घेणे हाच मोठा उपाय ठरत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !