BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

आमदार राजा 'उदार' झाला आणि हाती भोपळा दिला !



शोध न्यूज : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास सहानुभूती दाखवत भेटायला गेलेल्या आमदार नामदेवराव ससाणे यांनी मदत म्हणून एक बंद पाकीट दिले आणि जेंव्हा ते उघडले गेले तेंव्हा या कुटुंबाला  मोठा धक्का तर बसलाच पण परिसरात चर्चा देखील सुरु झाली.


नापिकी आणि कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. अगणित शेतकऱ्यांनी आपले जीवन अशा प्रकारे संपविले असून अजूनही हे सत्र थांबायला तयार नाही. शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्या की राजकीय मंडळी या घटनेचे दु:ख व्यक्त करतात आणि संबधित कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करतात. काही आश्वासनेही देतात पण ही आश्वासने अनेकदा तेवढ्यापुरतीच असतात. या दिलेल्या आश्वासनाची पुन्हा कुणालाच आठवण रहात नाही आणि शेतकऱ्याचे कुटुंब संकटांचा सामना करीत आयुष्य कंठीत असते. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील हिरामण नगर - निंगणपूर येथे मात्र वेगळाच अनुभव आला. 


'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला' अशी एक म्हण प्रचलित आहे, याच म्हणीचा प्रत्यय येथील एका शेतकरी कुटुंबाला आणि त्या परिसराला देखील आला आहे. चंपत नारायण जंगले या शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असतनाच आमदार नामदेवराव ससाणे यांनी या कुटुंबाला भेट दिली. घडलेल्या घटनेबध्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. आमदार घरी येवून सांत्वन करीत असल्याने या कुटुंबासह अन्य शेतकऱ्यांना देखील बरे वाटले. आमदारसाहेब आले म्हटल्यावर आजूबाजूचे शेतकरीही जंगले यांच्या घरी जमले. आमदार साहेबांनी जाता जाता एक बंद पाकीट हातात दिले आणि त्यांनी निरोप घेतला.


आमदारांनी या कुटुंबाला मदत म्हणून बंद पाकीट दिले म्हणजे नक्कीच या कुटुंबाला  काही आधार मिळेल अशीच रक्कम असणार असे सर्वांनाच वाटून गेले. नुकतेच हे आमदार महोदय दहीहंडीच्या कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित होते आणि त्यांनी पुढच्या वर्षीच्या दहीहंडीसाठी दोन लाखांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. आमदार महोदय निघून गेल्यानंतर शोकाकुल कुटुंबाने त्यांनी दिलेले बंद पाकीट मोठ्या अपेक्षेने उघडून पहिले तर त्यात केवळ दोन हजार रुपयांची मदत होती. हे पाहून सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उतरला.  दहीहंडीसाठी दोन लाखांचे बक्षीस जाहीर करणारे आमदार, एका कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर दोन हजार रुपयांची मदत देवून गेले होते. (Help of two thousand from the MLA, people are angry) या मदतीची चर्चा काही क्षणात गावभर झाली आणि प्रत्येकजण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत राहिला. 


आमदारांनी या कुटुंबाला मदत दिली की त्यांच्या जखमेवर मीठ चोळून निघून गेले ? असा सवाल देखील गावकरी विचारू लागले. गावातील ही बातमी परिसरात पसरली आणि त्यानंतर थेट आमदार नामदेवराव ससाणे यांच्याही कानापर्यंत ही नाराजी आणि गावकऱ्यांचा संताप पोहोचला. आमदार ससाणे यांनी दुरुस्ती करीत पुन्हा तीन हजार रुपये आपल्या एका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या कुटुंबाला पोहोच केले. आधी दोन हजाराची मदत आणि नंतर गाजावाजा झाल्यावर आणखी तीन हजार असे पाच हजार रुपयांची मदत करून आमदार महाशय कृतकृत्य झाले. बोभाटा व्हायचा तो झाला आणि लोकांनी आपला संताप शब्दांतून व्यक्त केला. परिसरातून निषेधाचे पडसाद देखील उमटले. 


जखमेवर मीठ !
आमदार ससाणे यांनी आत्महत्या केलेल्या कुटुंबाला भेट दिल्याचे लोक समाधानी झाले होते पण त्यांनी दिलेली मदत जेव्हा समजली तेंव्हा मात्र लोकांच्या मनात संताप आणि चीड निर्माण झाल्याचे दिसू लागले. दहीहंडीला दोन लाखांचे बक्षीस जाहीर करणारे आमदार उघडे पडलेल्या एका कुटुंबाला पाच हजार मदत देतात हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, मयत शेतकऱ्याच्या पत्नीची ही चेष्टा आहे अशा भावना लोक व्यक्त करू लागले आहेत. 


या पैशाचे काय करू? 
आमदार ससाणे यांनी दिलेल्या या पैशाचे आता मी काय करू? असा सवाल मयत शेतकरी चंपत जंगले यांच्या पत्नी धुरपदा जंगले यांनी केला आहे. या पैशातून सासूच्या दवाखान्याचा खर्च करू की शेतीसाठी खतपाणी करू की लेकरांना खाऊ घालू ?  असे हताशपणे धुरपदा जंगले विचारू लागल्या आहेत.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !