BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० सप्टें, २०२२

लोकांनी पकडलं, पोलिसांनी सोडून दिलं !



शोध न्यूज : मुले पळविणारी महिला आल्याचे समजून लोकांनी तिला पकडून पोलीस ठाण्यात आणलं पण पोलिसांनी चौकशी करून तिला सोडून दिलं असल्याची घटना सोलापूर येथे घडली.


गेल्या काही दिवसांपासून मुले पळविणाऱ्या टोळीची राज्यभर अफवा आहे. अद्यापपर्यंत अशी कुठलीही टोळी आढळून आली नाही अथवा कुठल्या एकाही मुलाला पळविण्यात आले नाही तरी देखील या नसलेल्या टोळीची दहशत मनामनावर असल्याचे दिसत आहे आणि यातून निरपराध महिलांनाही त्रास सहन करावा लागत आहे. मुले पळविणारे समजून राज्यात अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना मारहाण होण्याच्या घटना घडल्या आहेत. सोलापुरात देखील एका महिलेला मुले पळवणारी महिला आल्याचे समजून बराच गोंधळ उडाला. सुदैवाने पोलिसांशी संपर्क झाल्याने या महिलेची सहीसलामत सुटका झाली आहे.


सोलापूर येथील सैफुल परिसरातील आफरोज हशामोद्दिन शेख ही ३४ वर्षे वयाची महिला बुरखा घालून निघालेली असताना कुलकर्णी तांड्यावर दहशत निर्माण झाली. सोलापूर - विजयपूर मार्गावर असलेल्या कुलकर्णी तांड्यावर आफरोज शेख यांना पाहताच मुले पळविणारी महिला आली म्हणून गोंधळ  उडाला. ही अफवा अत्यंत वेगाने परिसरात पसरली. वास्तविक ही महिला घरातील वादामुळे रागाच्या भरात निघालेली होती पण बुरखाधारी महिला असल्यामुळे लोकांनी गैरसमज करून घेतला. सदर अफवा पसरताच लोकांनी गर्दी केली. (Terror in Solapur by a gang of child kidnapping) काही जणांनी आफरोजला धक्काबुक्की देखील केली पण ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करीत धक्काबुक्की करणाऱ्याना रोखले आणि पोलिसांशी संपर्क केला. 


बुरखाधारी महिलेला चेहरा दाखविण्यास सांगितले असता या महिलेने नकार दिल्यामुळे लोकांना अधिकच संशय आला आणि ही मुले पळविण्यासाठीच आलेली महिला आहे असा गैरसमज झाला. समजूतदार लोकांनी या महिलेला पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी चौकशी केली तेंव्हा सत्य समोर आले आणि पोलिसांनी या महिलेच्या वडिलांना बोलावून घेतले. या महिलेला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. सुदैवाने लोकांकडून या महिलेस मारहाण झाली नाही. धक्काबुक्की होऊ लागताच काहींनी मध्यस्थी केल्यामुळे महिलेला अधिक त्रास झाला नाही. लोकांनी बुरखा काढण्यास सांगितले असताना या महिलेने नकार दिल्याने गैरसमजात वाढ झाली. अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस करीत असतानाही लोकांच्या मनात मात्र या नसलेल्या टोळीची भीती कायम असल्याचे दिसत आहे.


गैरसमजातून अनेक घटना 

राज्यात  मुले पळविणारी टोळी समजून होणाऱ्या गैरसमजातून अनेक घटना घडू लागल्या आहेत.  बुरखा घालून प्रेयसीला भेटायला निघालेल्या एका तरुणास जमावाने बेदम चोपण्याची घटना घडली आहे. कुणी अनोळखी व्यक्ती दिसली की ती मुले पळविणारीच आहे असा गैरसमज करून त्याला मारहाण केली जात आहे. विशेषत: बुरखा घातलेली महिला दिसली की हा संशय अधिक बळावला जात आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारे संशय घेण्याच्या आणि मारहाण होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. 


सांगोल्यातून सुरुवात !

सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा सांगोल्यातून सुरु झाली. सांगोला तालुक्यातील महूद येथे शाळेच्या परिसरात एक बुरखाधारी महिला वावरताना दिसली की अतिउत्साही मंडळीनी तिची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केले. त्याचा विपरीत परिणाम शेजारच्या तालुक्यात आणि नंतर जिल्हाभर झाला. पोलिसांनी चौकशी केली असता ही महिला मनोरुग्ण असल्याचे समोर आले. पोलिसांनी वस्तुस्थिती जाहीर करूनही अफवांचे पिक फोफावतच राहिले आहे.   



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !