BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ सप्टें, २०२२

मुले पळविणाऱ्या टोळीची सोलापूर जिल्ह्यात धास्ती !

 


शोध न्यूज : मुले पळविणारी टोळी सोलापूर जिल्ह्यात आल्याच्या धास्तीने पालकांत प्रचंड घबराट निर्माण झाली असून प्रत्यक्षात ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 


मुले पळवून नेणाऱ्या टोळीचा वावर असल्याची अफवा केवळ सोलापूर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून राज्याच्या विविध भागात अशाच प्रकरच्या अफवा पसरल्या आहेत आणि यातून एकेक घटना देखील घडू लागल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी समजून पंढरपूरला निघालेल्या काही साधूंना लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सांगली, पुणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बीड अशा विविध भागात या नसलेल्या टोळीने दहशत निर्माण केलेली आहे. त्यात सोशल मीडिया अधिक खतपाणी घालू लागला आहे. शाळेतून मुलांना पळवून नेल्याचा एक मेसेज कुणीतरी पसरवला आणि पुणे परिसरात पालकांचे धाबे दणाणले. पोलिसांनी सगळ्या शाळांत चौकशी करून पाहिले असता कुठल्याही शाळेतील मुलांना पळविण्यात आलेले नसल्याचे समोर आले.

 

सोशल मीडियाने धिंगाणा घातला असून 'मुले पळविणारी टोळी सक्रीय', 'मुले पळविणारी महिलांची टोळी', 'अमुक तमुक भागातून मुलांना पळवून नेले' अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावरून पसरत राहिले आणि तितकीच पालकांची चिंता वाढत राहिली. पोलिसांनी अखेर चौकशी करून ही सर्व अफवा असून एकाही मुलाला पळवून नेण्यात आलेले नाही हे स्पष्ट करावे लागले.  सांगली जिल्ह्यातही गैरसमजाने चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. प्रत्यक्षात हे साधू उत्तर प्रदेशातील असून ते देवदर्शनासाठी भ्रमंती करीत होते. राज्याच्या विविध भागात पसरलेली ही अफवा सोलापूर जिल्ह्यातही पोहोचली आणि पालाकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात सोलापूर जिल्ह्यात देखील अशी कुठली टोळी नसून कुठल्याही मुलाला पळविण्यात आलेले नाही.


गेल्या काही दिवसांपासून सांगोला परिसरात लहान मुलांना पळविणारी बुरखाधारी महिलांची टोळी असल्याचे वावड्या उडत राहिल्या. त्याला सोशल मीडियात बळ मिळाले. कुठल्याही गोष्टीची खातरजमा न करता या कथित टोळीबाबत काही मेसेज आणि फोटो सोशल मीडियात येवू लागले आणि याचा परिणाम इतर तालुक्यात देखील होऊ लागला. पंढरपूर परिसरात देखील अशी अफवा पसरली आणि पालकांची चिंता वाढली. सांगोला तालुक्यातील महूद येथील एका महिलेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आले आणि मुले पळविणारी टोळी असल्याची अफवा पसरली गेली. महूद येथील एका शाळेच्या परिसरात ही महिला फिरत होती आणि एवढ्यावर मुले पळविणारी टोळी म्हणून अफवांचे पीक आले आहे. 


शाळेच्या परिसरात फिरणारी महिला ही मनोरुग्ण होती. या महिलेचा व्हिडीओ तयार करून आणि मुले पळविणारी टोळी संबंधित फोटो सोशल मीडियातून पाठविण्याचा आततायीपणा काही दीड शहाणे मंडळीनी केला आणि त्याचा परिणाम पालकांत दहशत निर्माण होण्यात झाला. पंढरपूर येथेही याचा परिणाम जाणवला आणि अनेक चिंताग्रस्त पालक भीतीने या घटनेची चौकशी करू लागल्याचे दिसून आले. महूद येथील कथित घटनेने अकारण नागरिकांत घबराट निर्माण केली. 


महूद येथील शाळेच्या परिसरात आढळलेली  ही महिला वेडसर होती, तिचा मुले पळविण्याशी काहीही संबंध नाही. या महिलेबाबत कसलीही माहिती न घेता आणि खात्री न करता उतावीळपणा करण्यात आला. गृपवरून खोटे मेसेज आणि व्हिडीओ फिरत राहिल्यामुळे अकारण भीती निर्माण झाली आहे. (The terror of a gang of child abductors in Solapur district) सांगोला पोलिसांनी देखील याबाबत चौकशी केली आहे. नागरिकांनी कुठल्याची अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सांगोला पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !