BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ सप्टें, २०२२

पोस्टातील नौकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक !

 



शोध न्यूज : पोस्टात नोकरी मिळवून देतो म्हणून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने एक प्रकरण पंढरपूर येथे उघडकीस आले असून सात जणांना २३ लाखाला गंडा घातल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वरचेवर बेकारी वाढत असून तरुण तरुणी नोकरीच्या शोधात सतत प्रयत्नशील असतात. नोकरीचा शोध सुरु असताना त्यांची गरज पाहून काही भामटे गैरफायदा उठवतात आणि आधीच अडचणीत असलेल्या तरुणांची आर्थिक फसवणूक करीत असतात. असे अनेक प्रकार उघडकीस आले असताना पंढरपूर येथील एक मोठे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. टपाल विभागात नोकरी मिळवून देतो म्हणून सांगोला तालुक्यातील एका भामट्याने पंढरपूर येथील सहा जणांची आर्थिक फसवणूक केली असून २३ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. याबाबत पंढरपूर पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


सांगोला तालुक्यातील मांजरी येथील संशयित आरोपी सचिन देविदास शिनगारे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार देण्यात आली असून फसवणूक झालेल्यांनीच त्याला कौशल्याने पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. पोस्ट खात्यात आपल्या मोठ्या ओळखी असून काही रक्कम देवून त्यांच्याकडून पोस्टात नोकरी लावून देतो म्हणून या आरोपीने लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंढरपूर येथील सहा जणांना अशा प्रकारे लाखो रुपयांना टोपी घालण्याचा हा प्रकार आहे.


हर्बल प्रोडक्ट घेण्याच्या निमित्ताने पंढरपूर येथील गाताडे प्लॉट येथे राहणाऱ्या प्रतीक्षा राजेंद्र मोरे आणि आरोपी सचिन शिनगारे यांच्यात परिचय झाला होता. मोरे यांनी गेल्या वर्षी पोस्टात नोकरीसाठी अर्ज केलेला होता ही माहिती शिनगारे याला मिळाली आणि त्याने आपले भामटे जाळे पसरायला सुरुवात केली. पोस्टात आपल्या वरपर्यंत ओळखी आहेत त्यामुळे काही रक्कम देवून त्यांच्याकडून नोकरी मिळवून देवू शकतो अशी बतावणी त्याने केली. त्याच्या बोलण्यावर मोरे यांनी विश्वास दाखवला प्रतीक्षा मोरे आणि त्यांच्या बहिणीला पोस्टात नोकरी मिळवून देतो म्हणून आरोपी शिनगारे याने त्यांच्याकडून तब्बल ९ लाख रुपये घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


आरोपीने पोस्टाचा लोगो वापरून एक बनावट ओळखपत्र तयार केले. एक बनावट इ मेल आय डी तयार करून त्यावरून मोरे यांना एक मेल पाठवला. त्याद्वारे नकली अर्ज क्रमांक, केंद्र याची खोटी माहिती दिली. पोस्ट खात्याकडूनच हा मेल आल्याचे मोरे यांना वाटून गेले. याच दरम्यान त्याने भूलथापा देत त्यांच्याकडून ९ लाखांची रक्कम उकळली. अशाच प्रकारे अन्य काही तरुणांची देखील याच आरोपीने फसवणूक केल्याचे समोर आले असून आणखी किती तरुण तरुणी त्याच्या या फसव्या जाळ्यात सापडले आहेत हे पोलीस तपासात समोर येणार आहेच. आणखी एका मुलीला आपण पोस्टात नोकरी मिळवून दिली असून ती मुलगी मंगळवेढा येथे नोकरीवर असल्याचेही त्याने सांगितले आहे.


दरम्यान पंढरपूर येथील गाताडे प्लॉट येथीलच विठ्ठल भगवान धोत्रे यांच्याकडून ३ लाख, संजय मोरे यांच्याकडून अडीच लाख, इसबावी येथील अर्जुन कृष्णा शेजवळ यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या नोकरीसाठी ४ लाख तसेच अनिल बनकर, सुरेखा मोरे, आबासाहेब मोरे यांच्याकडूनही रक्कम घेवून त्यांचीही फसवणूक करण्यात आल्याची माहिती उघड होऊ लागली आहे. (Big financial fraud in Pandharpur by claiming to provide job in post office) पोलीस तपासात आणखी काही प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


कर्ज काढून पैसे दिले !

इसबावी येथील अर्जुन कृष्णा शेजवळ यांनी आपल्या मुलाच्या नोकरीसाठी चक्क एफ डी वर कर्ज काढून चार लाखांची रक्कम दिली आहे. आपल्या मुलाला नोकरी मिळेल या आशेने त्यांनी कर्ज काढून ही रक्कम त्याच्या हवाली केली होती. आपली यात फसवणूक झाल्याने लक्षात आल्यावर त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात तक्रार केली.


आरोपीची अरेरावी !

आपले भांडे फुटले आहे हे लक्षात आल्यावरही आरोपी शिनगारे याची अरेरावी सुरूच होती. आपल्या विरोधात पोलिसात तक्रार दिली जाऊ नये यासाठी तो मोरे यांच्यावर दबाव आणू लागला होता. प्रतीक्षा मोरे यांच्यावर हात उचलण्याची देखील त्याची मजल गेली होती. अखेर फसवणूक झालेल्या लोकांनीच त्याला कौशल्याने पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !