BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ सप्टें, २०२२

साखर कारखाने ऊसाच्या वजनात दहा टक्के काटा मारतात !



शोध न्यूज : महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाने सरासरी वजनात दहा टक्के काटा मारीत असल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. 


शेतकरी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घाम गाळून आणि कर्जाचे ओझे डोक्यावर घेवून ऊस पिकवत असतो. ऊस कारखान्याला गेला की सगळ्या उधारी चुकवून चार पैसे गाठीला राहतील अशी त्याची अपेक्षा असते. ऊस साखर कारखान्यांना जातोही पण कारखाना योग्य वजन करीत नाही, काटा 'मारला' जातो अशा तक्रारी साखर कारखान्याच्या बाबतीत शेतकरी करीत असतात. काटा मारण्याचे आरोप फार पूर्वीपासून केले जात असतात पण ते पुराव्यासह समोर येत नाही आणि हे आरोप चर्चेतच राहतात. काही शेतकरी खाजगी काट्यावर वजन करून कारखान्याला ऊस देतात पण कारखान्याच्या काट्यावर वजन केल्यानंतर तफावत आढळून येते असेही काही ऊस उत्पादकांचे म्हणणे आहे. आता मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यावर थेट भाष्य केले आहे. 

महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाने सरासरी वजनाच्या दहा टक्के काटा राजरोसपणे मारतात असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मागील हंगामात राज्यात १३ कोटी २० लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे, काटा मारून १ कोटी ३१ लाख टन ऊसाची चोरी झाली असून ही चोरी साखर कारखान्यांनी केली आहे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली असून आपल्या कष्टाचा ऊस असा चोरीला जात असल्याबाबत शेतकरी देखील अवाक झाले आहेत. साखर कारखानदारांनी ४ हजार ५०० कोटींचा दरोडा टाकलेला आहे तर शासनास यातून मिळणारा २२९ कोटींचा जीएसटी कर बुडवला आहे असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

पेट्रोल पंप चालकांना आईल कंपनीच्या परवानगीशिवाय पेट्रोल मोजमाप करणाऱ्या यंत्राशी आजीबात छेडछाड करता येत नाही. साखर आयुक्तालयाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून पासवर्ड घेतल्याशिवाय साखर कारखान्याच्या वजन काट्याला काहीही करता येणार नाही अशी व्यवस्था असण्याची गरज आहे. साखर कारखान्याच्या बाबतीत असे का घडत नाही ? साखर आयुक्त यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही साखर कारखान्यास वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही असा आदेश का काढला जात नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Sugar factories steal farmers' sugarcane, Raju Shetty alleges)  राज्यात जवळपास दोनशे वजन काटे हे डिजिटल स्वरूपातील असून वजनात काटा मारणे रोखले जावे यासाठी हे काटे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून साखर आयुक्तालयाकडे जोडले जाणे गरजेचे आहे असा पर्यत देखील राजू शेट्टी यांनी सुचवला आहे.

आयुक्तांकडे तक्रार !
काटा मारून तयार करण्यात आलेली साखर रात्री उशिरा गायब करण्यात येते आणि मिठाईवाले, किरकोळ दुकानदार, शीतपेयांच्या कंपन्या यांना ही साखर विना पावतीची विक्री करण्यात येते. शासकीय दरांप्रमाणे ही किंमत ४ हजार ५८१ कोटी रुपयांची होते आणि याचा जीएसटी कर २२९ रुपयांचा होतो. जीएसटी विभाग किरकोळ व्यापाऱ्यावर धाडी टाकतो पण येथे का गप्प बसतो? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला असून त्यांनी या संदर्भात जीएसटी आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे तक्रार केली आहे. राजू शेट्टी यांनी मांडलेले गणित पाहून शेतकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !