BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

वाहने थांबवून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या !



शोध न्यूज : समोर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (Fake RTO) असल्याचे सांगत रस्त्यावर वाहने अडवून लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीस पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखोंचा माल हस्तगत करण्यात आला आहे. 


अलीकडे भामटे लोकांना लुटण्यासाठी नवनवे फंडे अमलात आणताना दिसतात . रस्त्यावरून जाणाऱ्याला आपण पोलीस आहोत असे सांगून त्यांचे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगतात आणि हातचलाखी करीत दुसरेच गाठोडे ठेवून सोने लंपास करतात. हा प्रकार आता लोकांना माहित झाला आहे. सोलापूर- धुळे मार्गावर उसमानाबाद हद्दीत चक्क तोतया आरटीओ बनून एक टोळी चक्क वाहने थांबवून त्यांना लुटत होती. ही टोळीच पोलिसांनी मोठ्या कौशल्याने पकडली आहे. आरटीओ म्हटले की वाहनधारक घाबरतात. वाहनचालक नियम पाळत नाहीत त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई होणार हे उघड असते. त्यामुळे वाहनचालक घाबरलेले असतात आणि याचाच फायदा या टोळीने उठवला होता.


सोलापूर - धुळे मार्गावर उस्मानाबाद जिल्ह्याच्या हद्दीत काही लोक वाहने थांबवून त्यांची लुटमार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. सय्यद सज्जाद पाशा या चालकाचा एक ट्रक या टोळीने समरकुंडीजवळ अशाच पद्धतीने रोखला होता. 'समोर आरटीओ पोलीस थांबलेले आहेत. वाहनांना ते दंड करीत आहेत त्यामुळे थोडा वेळ येथेच थांबा आणि मग पुढे जा'  असे या टोळीतील एकाने सांगितले. समोरही दोन ट्रक थांबलेले पाशा यांना दिसले त्यामुळे त्यांनी आपलाही ट्रक बाजूला घेवून थांबवला. आणि याचवेळी या टोळीतील लोकांनी चालक सय्यद पाशा यांच्या खिशातील ९ हजाराची रक्कम काढून घेतली आणि तेथून पसार झाले. या घटनेची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली होती. वाशी पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पंधरा जणांचे एक पथक तयार करण्यात आले होते आणि या पथकाने आपला तपास सुरु केला होता. हे पोलीस पथक आरोपींच्या मागावर होतेच आणि त्यांना काही गुप्त माहितीही मिळाली होती. त्याच्या आधारे यशवंडी शिवारात मध्यरात्री पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी लावलेल्या या सापळ्यात सहा जणांची टोळी आयतीच सापडली आणि एका मोठ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.  


या टोळीत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एकाचा समावेश आहे. अकोला येथील अलीखान हुसेन अफजल हुसेन, (वय ३२ ) आणि जान अली जहरअली (२५),  बीड जिल्ह्यातील गेवराई येथील अन्वरअली किस्मतअली,(३०), मिर्जा जावेदअली यावरअली (४५) जालना जिल्ह्यातील अंबड येथील युसुफ शराफत अली (४१) आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गुलाब जाफर हुसेन (४८) यांना पोलिसांनी अटक केली आहे.


यसवंडी परिसरात पकडलेल्या या टोळीकडून पोलिसांनी लाखोंचा माल हस्तगत केला असून यात एक ट्रक, दोन मोटार सायकल, दोन आयशर टेंपो आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. (A gang that stopped vehicles and robbed them was arrested) पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे हा तपास करून मध्यरात्रीनंतर टोळी पकडण्यासाठी सापळा लावला होता. संपूर्ण टोळी पकडली गेल्याने पोलिसांचे कौतुक होऊ लागले आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !