BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ सप्टें, २०२२

पांढरे केस उगवल्यामुळे सलून चालकाला चप्पलने मारहाण !

 


शोध न्यूज : केस काळे करूनही पांढरेच राहिल्याने संतापलेल्या एका महिलेने सोलापुरातील एका सलून व्यावसायिकास थेट चपलेनेच मारहाण केल्याची अजब आणि धक्कादायक घटना घडली आहे.

केसाला रंग लावल्यावर तो रंग लगेच निघून जाण्याची कारणे काहीही असली तरी सोलापुरातील एका महिलेला मात्र हे आजीबात रुचले नाही आणि तिने थेट सलून चालकाला चप्पलाने मारले. 'आपल्या केसांना व्यवस्थित कलर केले नाही, केस काळे झालेच नाहीत आणि जसेच्या तसे पांढरे दिसत आहेत' असे म्हणत या महिलेने चपलेचाच 'प्रसाद' दिला आणि या घटनेची जिल्हाभर चर्चा देखील होऊ लागली आहे. सात रस्ता परिसरातील डायमंड हेअर सलून आणि ब्युटी पार्लर येथे ही घटना घडली असून मोहम्मद साजिद सलमाने यांनी सदर बजार पोलीस ठाण्यात महिलेच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

  
वर्षा काळे या महिलेने १९ ऑगष्ट रोजी 'डायमंड' मध्ये हेअर कट आणि हेअर कलर केले होते. यासाठी पाच हजार रुपये आकारण्यात आले होते. सदर महिला आता पुन्हा या सलूनमध्ये दाखल झाली आणि आपले केस काळे झाले नाहीत, कलर करूनही पांढरे केस दिसत आहेत याबाबत जाब विचारत घेतलेले पैसे परत करण्याची मागणी केली. कलर केलेले केस तसेच आहेत, नव्याने आलेले केस पांढरे आहेत त्याला पर्याय नाही असे सलून चालक मोहम्मद कासीम यांनी सांगितले. या उत्तराने सदर महिलेचे समाधान झाले नाही आणि तिने संतापून चक्क चप्पल हातात घेवून सलून चालकास मारण्यास सुरुवात केली.


संतापलेल्या या महिलेने केवळ सलून चालकाला चप्पलने मारहाण करण्यावर हे प्रकरण आटोक्यात आले नाही तर तिने दुकानाची देखील नासधूस केली असल्याचे आणि दुकानातील काही साहित्य आपल्या घरी नेल्याचा आरोप सलून चालकाने केला आहे. डोक्यात नैसर्गिकरित्या नव्याने पांढरे केस उगवले आहेत, ते पुन्हा काळे करावे लागतील असे आपण या महिलेस सांगितले पण त्या काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. चप्पलने मारहाण करून दुकानाच्या काचा देखील फोडून टाकण्यात आल्या असल्याचे सलून चालकाने सांगितले.


हल्ली पुरुष आणि महिलाही आपले केस काळे करून सौंदर्य वाढविण्याच्या प्रयत्नात असतात. अलीकडे लहान मुलांचे देखील केस पांढरे होताना दिसतात आणि पांढऱ्या केसामुळे तारुण्यातही वृद्धत्वाची झलक दिसू लागते. यामुळे आपले पांढरे केस काळे करून घेण्यासाठी बहुतेकांचा आटापिटा पाहायला मिळतो. कुणी घरीच आपले केस काळे करतात तर कुणी सलूनमध्ये जाऊन 'तरुण' दिसण्याचा प्रयत्न करीत असतात. केस काळे करण्यासाठी वापरले जाणारे डाय जुने अथवा काही काळ उघडे राहिले तर केस धुताच हा कलर निघून जातो आणि केस पुन्हा पूर्ववत होतात हा अनुभव अनेकांना आहे. 


सलून चालकाने या प्रकाराबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड विधान कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६ अन्वये हा गुन्हा दाखल झाला आहे. (Salon operator beaten with slippers for growing white hair)  या घटनेची मोठी चर्चा सुरु असून सोशल मीडियावर देखील लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत. अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याचे अनेकांचे मत आहे.  



.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !