BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ सप्टें, २०२२

आता एस. टी. थांबवावीच लागेल, नाही थांबली तर ---

  


शोध न्यूज : छोट्या बस थांब्यावर प्रवासी थांबलेले असतात आणि वेगाने आलेली एस. टी तशीच वेगाने पुढे निघून जाते आणि प्रवासी तिच्याकडे पाहात राहतात, यापुढे  असा प्रकार झाल्यास चालकावर कारवाई करण्यात येणार आहे.

 

'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद मिरवत राज्य परिवहन महामंडळाच्या बस दिमाखात धावत असतात पण प्रवाशांच्या सेवेचे ब्रीद अनेकदा विसरलेले असते आणि याचा मोठा फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसतो. राज्य परिवहन महामंडळ सतत काही ना काही योजना आणून एस टी चे प्रवासी वाढविण्याचा प्रयत्न करीत असते पण काही कर्मचाऱ्यांमुळे महामंडळाच्या योजनेला खो बसत असतो. 'गाव तिथे एस टी.', 'हात दाखवा, बस थांबवा' अशा प्रकारच्या योजना आणून प्रवासी वाढतील यासाठी प्रयत्न केला जातो परंतु प्रत्यक्षात वेगळेच चित्र दिसत असते. सामान्य प्रवासी एस. टी. नेच प्रवास करतो आणि या सामान्य प्रवाशांकडेच दुर्लक्ष होते. 


राज्य परिवहन महामंडळाचे काही चालक प्रवाशांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करताना नेहमीच दिसतात. प्रवाशांची सोय व्हावी यासाठी रस्त्यारस्त्यावर अनेक छोटे थांबे असतात आणि या थांब्यावर अनेक प्रवासी एस टी येण्याची वाट पहात उभेच असतात. एस टी येताना दिसली की त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा उमटतात, आपले सामान घेवून ते एस टी ला हात करतात पण 'आपला काही संबंध नाही' अशा थाटात काही चालक एस टी न थांबवता निघून जातात. प्रवासी मात्र तासनतास बसची वाट पहात बसतात. घाईचे काम असेल तर प्रवासी धोकादायक असले तरी खाजगी वाहनाचा आधार घेतात. आता मात्र चालकाला अशी मुजोरी करता येणार नाही. 


लहान थांब्यावर बस न थांबवता चालक पुढे निघून जात असल्याचा प्रकार जुनाच असला तरी राज्य परिवहन महामंडळाकडे याबाबत तक्रारी आलेल्या असून त्याची महामंडळाने गंभीरपणे दखल घेतली आहे. यापुढे थांब्यावर बस थांबवली नाही तर चालकाला दोषी धरले जाणार असून त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. या प्रकारात वाहकाला देखील दोषी धरले जाऊन त्याच्यावरही कारवाई करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. लहान थांबे असले तरी ते प्रवाशांच्या सोयीसाठीच निश्चित करण्यात आले आहेत आणि अशा थांब्यावर बस थांबविणे हे चालकाचे कर्तव्यच आहे. त्यामुळे चालकाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.


चालकाच्या अशा वर्तनामुळे प्रवाशांची गैरसोय होते, विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांची खूपच हेळसांड होत असते. चालक बस थांबवत नसल्याच्या अनेक तक्रारी महामंडळाकडे प्राप्त झाल्याने महामंडळाने याबाबत कडक भूमिका घेतली असून चालकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्य परिवहन महामंडळाने सर्व आगार आणि कार्यालये यांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. (State Transport Corporation order to stop ST at small stops) तक्रारीत अथवा मार्ग तपासणीत चालक दोषी आढळला तर त्याच्यावर आणि संबंधित वाहकावर देखील कडक कारवाई केली जाणार आहे. 

    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !