BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ सप्टें, २०२२

सोलापूरसह राज्याच्या विविध भागात पुन्हा मुसळधार !

 



शोध न्यूज : परतीचा प्रवास सुरु करण्याआधीच पावसाने पुन्हा 'दणका' द्यायला सुरुवात केली असून आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळणार असून राज्याच्या बहुतेक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


काल हवामान विभागाने पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले होते आणि राज्याच्या विविध भागात काल जोरदार पाऊस झाला अनेक भागात सूर्यदर्शन झालेच नाही तर ढगाळ हवामान कायम असून आज सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात दुपारीच पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. . ढगाळ हवामान आणि उकाड्यात वाढ झालेली असताना राज्याच्या विविध भागात आजही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. उद्या बुधवार ७ सप्टेंबर पर्यंत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा शक्यता असून गुरुवारपासून राज्यातील पाऊस आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून आज ६ सप्टेंबर रोजी मराठवाडा, विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तळकोकण येथे विजांचा कडकडाट होऊन पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.   


महाराष्ट्रातील  अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, धुळे, नंदुरबार, नाशिक, नांदेड,  भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा परभणी, हिंगोली या जिल्ह्याना मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.  उद्या बुधवारसाठी  पुणे, सातारा, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, लातूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारसाठी  सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहमदनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात पुढच्या तीन दिवसात पाऊस कोसळणार आहे.


मान्सून लवकरच परतीच्या प्रवासाला लागणार असला तरी सद्याचा पाऊस हा परतीचा पाऊस नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात मान्सून प्रस्थान करील आणि या दरम्यान पावसापासून वंचित राहिलेल्या भागात येत्या काही दिवस पाऊस होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. (Possibility of heavy rain again in Maharashtraआज झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या काही भागात देखील पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने  विविध राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा, ईशान्य भारत छत्तीसगड, ओरिसा, अंदमान निकोबार, केरळ, लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसापासून अतिवृष्टी देखील होऊ शकते.  

  
मोसमी पावसाच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्रातील अधिकाधिक भागात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस सप्टेंबर  महिन्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला आहे. देशभरात सरासरीच्या तुलनेत १०९ टक्के पाऊस या कालावधीत होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. ज्या भागात कमी पाउस झाला आहे आणि आजही पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागांना दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या महिन्यात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होणार आहे. हवामान विभागाने तशा स्पष्ट सूचना तर दिल्याच आहेत परंतु नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील केले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !