BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ सप्टें, २०२२

भीमा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथील बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मुंडेवाडी येथे सापडला असून भीमेच्या पुरात बळी गेलेल्यांच्या संख्येत आणखी एक वाढ झाली आहे. 


उजनी धरणातून पाणी सोडल्याने भीमा नदीला मोठा पूर असताना पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील एका तरुणाने जीवघेणे धाडस केले होते. गजेंद्र उर्फ सज्जन संतोष गायकवाड हा तरुण पोहोण्यासाठी म्हणून पुराच्या पाण्यात झेपावला होता. पाण्याला मोठी ओढ असताना आणि त्याला सावध केले असतानाही त्याने पुरात उडी मारली, तो परत बाहेर आलाच नाही. सदर तरुण आणि त्याचा काका भारत रामचंद्र गायकवाड हे दोघे करकंब येथे गेले होते. तेथून परत येत असताना पिराची कुरोली येथे आल्यावर गजेंद्र याने बंधाऱ्यावरून भीमा नदीच्या पात्रात उडी घेतली. नदीच्या पात्राला वेग असल्याने तो पाण्यात वाहून गेला होता. 


मृत्यू बोलावून घेतो असाच काहीसा प्रकार या तरुणाच्या बाबत घडला होता. करकंब येथून धोंडेवाडीकडे परत येत असताना पिराची कुरोली बंधारा येथे आल्यावर ते मासे घेण्यासाठी थांबले. 'तुम्ही मासे घ्या, तोपर्यंत मी पोहून येतो' असे काकाला म्हणत गजेंद्र गायकवाड हा बंधाऱ्याकडे गेला. 'नदीला पाणी जास्त आहे, पाण्यात जाऊ नको' असे चुलत्याने त्याला सांगितले पण 'आपल्याला पोहता येते' असे सांगून तो पुढे गेला. अखेर कठड्यावरून त्याने पुरात उडी घेतली पण तो पाण्यातील बोहऱ्यात अडकला आणि त्याला बाहेर येता आलेच नाही. (Death of a youth who was swept away by the Bhima river flood) त्यानंतर तो वाहून गेला असे उपस्थित असल्येल्या लोकांनी सांगितले होते.


गजेंद्र पुराच्या पाण्यात बुडाल्याने त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न झाला पण पुराच्या वेगवान प्रवाहात तो कुठे बेपत्ता झाला याचा शोध लागला नाहीच. सुरुवातीला तो पाण्याच्या भोवऱ्यात काही वेळ गोल गोल फिरत राहिला आणि नंतर मात्र तो दिसेनासा झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत राहिले पण गजेंद्रचा ठावठिकाणा लागलाच नाही.  गुजरात राज्यात एका सोन्या चांदीच्या दुकानात गजेंद्र नोकरीस होता. अलीकडेच तो आपल्या गावी परत आला होता. दुसऱ्या दिवशी तो परत गुजरातला जाणार होता परंतु या घटनेने सगळे काही जिथल्या तिथे थांबले. तरुण मुलगा वाहून गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्याचे मित्र देखील शोकाकुल झाले आहेत. 


पिराची कुरोली येथील बंधाऱ्यापासून पुराच्या पाण्यात अदृश्य झालेला एकवीस वर्षे वयाचा गजेंद्र शोधून सापडला नाही परंतु तिसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह मात्र सापडला आहे. मुंडेवाडी येथील बंधाऱ्यात पाण्यावर तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला. पुराच्या पाण्यात झेपावण्याचे अतिरेकी धाडस केले नसते तर ही घटना घडली नसती. भीमा नदीला पूर येण्याआधीपासून प्रशासन सावधगिरीच्या सूचना देत असते पण काही तरुण असे अघोरी धाडस करतात आणि मग अशा दुर्दैवी घटना घडतात. गजेंद्रच्या अशा जाण्यामुळे धोंडेवाडी परिसरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !