BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

शिंदे गटातील आमदार अडचणीत, पोलिसांनी केला गुन्हा दाखल !

 



शोध न्यूज : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेले आमदार सदा सरवणकर हे आता अडचणीत आले असून गोळीबार प्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता बळावली आहे.


मुंबईचा दादर परिसर हा शिवसेनेचा पूर्वीपासूनच बालेकिल्ला आहे आणि याच ठिकाणी शिवसेना आणि शिंदे गातात जोरदार राडा झाला होता. मध्यरात्री झालेल्या या राड्यात काही शिवसैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु शिवसेनेने शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप केला होता. हा आरोप आमदार सरवणकर यांनी फेटाळला होता. शिवसेनेने मात्र हा विषय गंभीरपणे घेतला आणि सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली होती. अखेर बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि अन्य दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने सरवणकर अडचणीत आले आहेत.


मध्यरात्री झालेल्या राड्यात आमदार सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवत दमबाजी केली असा आरोप शिवसेनेने केला आणि दादर पोलीस स्थानकाच्या बाहेर लावण्यात आलेले बॅनर शिवसेनेने फाडून टाकले. आमदार सरवणकर यांच्या कार्यालयावर आज जोरदार दगडफेक करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिवसेनेने सरवणकर यांच्यावर गोळीबाराचे आरोप केले असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता उलट शिवसैनिकावर भारतीय दंड विधान कलम ३९५ (जबरी चोरी) लावण्यात आले होते. परंतु याबाबत शिवसेना आक्रमक झाली आणि त्यानंतर पोलिसांना झुकावे लागले आहे.


शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्यासह दहा जणांचा समावेश आहे. (
Shinde group MLA Sada Saravankar in trouble) शिवाय शिवसैनिकांवर दाखल केलेले कलम ३९५ देखील वगळण्यात आले आहे. अटक केलेल्या पाच शिवसैनिकांना जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. 


वाद दुर्दैवी !
सणासुदीच्या काळात असे वाद होणे हे दुर्दैवी आहे पण हे घडले आहे. हिंदू समाजाला वेदना होतील अशा कुठल्याही घटना घडू नयेत यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायला हवा, विसर्जनावेळी उभारलेल्या स्वागत कक्षावरून एकमेकांना डिवचण्याचे काय प्रकार झाले असे सांगितले जाते, हे प्रकार तिथेच थांबायला हवे पण त्याचा राग मनात ठेवून नंतर जे घडले हे संयुक्तिक नव्हते अशी प्रतिक्रीया शिंदे गटातील आमदार सरवणकर यांनी दिली आहे. 


पुंगळी सापडली !

गोळीबार झाल्याचे जे ठिकाण सांगितले जाते त्याच ठिकाणी कादातुसाची एक रिकामी पुंगळी पोलिसांना सापडली आहे. ही पुंगळी सरवणकर वापरत असलेल्या पिस्तुलाचीच आहे का याची चौकशी आता केली जाणार आहे. त्यासाठी त्यांचे पिस्तुल आणि रिकामी पुंगळी फोरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. 

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !