BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ सप्टें, २०२२

चला सभेला .... वाहनांसह जेवण नाष्टा फ्री आणि वर पैसेही !

 



शोध न्यूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या सभेबाबत बऱ्याच घटना घडू लागल्या असून 'चला सभेला .... जेवण नाष्टा फ्री वर पैसेही' ! असा प्रकार सुरु असल्याचे आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सभेला गर्दी करण्याचे फर्मान काढण्यात आल्याचा विषय वादाचा ठरले आहेत.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या १२ सप्टेंबर रोजी पैठण येथे जाहीर सभा होणार आहे पण सभेपूर्वीपासूनच ही सभा आरोपांनी आणि वादाने गाजू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची पैठण येथे सभा झाली होती आणि या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्यानंतर मंत्रीपदाची शपथ घेवून एकनाथ शिंदे गटाचे मात्री संदीपान भुमरे हे पहिल्यांदाच पैठण येथे आले होते आणि त्यांचाही एक कार्यक्रम झाला होता. मंत्री बनून आलेल्या भुमरे यांच्या या कार्यक्रमास आजीबातच गर्दी नव्हती आणि खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या. या खुर्च्यांचे व्हिडीओ आणि फोटो राज्यभर व्हायरल झाले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही परिस्थिती राज्यभर पोहोचवली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांना आता स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते.


मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमाचा फियास्को झाल्यावर आता पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच सभा होत आहे त्यामुळे सभेला गर्दी होण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. परंतु गर्दी जमविण्याचा विषय प्रचंड वादात सापडताना दिसत आहे. शिंदे गटाकडून सभेसाठी गर्दी जमावी यासाठी भाडोत्री लोकांना आणण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या सभेस येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे, (Free food, breakfast and money at the Chief Minister's meeting) एवढेच नव्हे तर नाष्टा, जेवण आणि रोख रक्कम देण्यात येणार असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. 


आदित्य ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाली आणि भुमरे यांच्या सभेत शंभर खुर्च्यावर देखील माणसे नव्हती. यामुळे चवताळून एकनाथ शिंदे यांच्या उद्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होत असलेल्या सभेचीही मोठी फजिती होऊ लागली असून हे मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे. या सभेसाठी गाड्यांची व्यवस्था तर करण्यात आलीच आहे पण नाष्ट्याची, जेवणाची व्यवस्था आणि सभा झाल्यानंतर काही रकमेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सभेला येण्यासाठी नेमकी किती रक्कम दिली जाणार आहे याबाबत मात्र मी उद्याच सांगेन' असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेबाबत समोर आलेल्या एका पत्राने आणखीच गोंधळ उडवून दिला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना पकल्प प्राधिकरणाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी थेट एक आदेशच काढला असून प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका तसेच ४२ गावातील अंगणवाड्या सेविका / मदतनीस यांनी सभेस उपस्थित राहण्याचे आदेशच दिले आहेत. हे पत्र समाज माध्यमावर देखील व्हायरल होत असून सभेला गर्दी जमविण्यासाठी काय काय केले जात आहे यावर चर्चा सुरु झाली आहे तर विरोधी पक्षाकडून टीका होऊ लागली आहे. 


सरकारी यंत्रणा कुणाच्या मालकीची नसते, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांचे प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला आणि त्यांना मुख्यमंत्री यांच्या सभेला हजर राहण्यास सांगितले जात आहे. सभेसाठी रेटकार्ड पर्सिध्द झाल्याची माहिती मिळाली असून पैठणचे लोक सभेला येणार नाही म्हणून बीड आणि गेवराई, अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव येथून वाहने भरून लोक आणण्याचा प्रकार सुरु असल्याचे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले आहेत. प्रकल्प विकास अधिकारी यांनी काढलेल्या पत्रामुळे मात्र प्रचंड खळबळ उडाली असून राजकीय कार्यक्रमास सरकारी लोकांना बोलाविण्यात आल्याच्या या प्रकारचे आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. 


पत्र बनावट ?
अधिकाऱ्यांशी दानवे यांनी चर्चा केली असता त्यांना याबाबत नेमके उत्तर मिळू शकले नसून संबंधित अधिकारीच सांगू शकतील असे म्हटले आहे पण शिंदे गटाने मात्र हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे म्हटले आहे. सदर पत्र व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने आता हे पत्रच बनावट असल्याचे म्हटले आहे. पदाधिकाऱ्याने खुलासा करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने असे म्हटले असते तर कदाचित त्यावर विश्वास ठेवला गेला असता पण अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत. सदर पत्र बनावट आणि खोटे असल्यास संबंधित अधिकारी यांनी सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण हे पत्र जर खरेच बनावट असेल तर नाहक बदनामीही थांबली पाहिजे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !