BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ सप्टें, २०२२

महिला सरपंच बेपत्ता, पाच दिवसानंतरही ठावठिकाणा नाही !

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील कवठे ग्रामपंचायतीच्या बेपत्ता झालेल्या महिला सरपंच अद्यापही सापडल्या नसून शेळ्या चारायला म्हणून गेल्या त्या परत आल्याच नाहीत. पाच दिवस झाल्याने आता मात्र अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे येथील महिला सरपंच जैतूनबी शेख भाभी या बुधवार पासून बेपत्ता झाल्या आहेत. बुधवारी ७ सप्टेंबर रोजी त्या दुपारच्या वेळेस शेळ्या चारायला म्हणून बाहेर पडल्या त्या परतल्याच नाहीत. भाभी शेळ्या घेवून शेतात गेल्या आणि शेळ्या परत आल्या परंतु भाभी परतल्याच नाहीत. ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच असलेल्या जैतूनबी शेख या ६५ वर्षांच्या असून त्यांच्या अचानक गायब होण्याने आणि शोध घेवूनही सापडत नसल्यामुळे चिंता वाढू लागली आहे. भाभीचे चिरंजीव सरदार शेख यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिलेली असून पोलीस देखील त्यांचा शोध घेत आहेत. 


शेळ्या चारायला म्हणून गेलेल्या जैतूनबी शेख या बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबात तर चिंता आहेच पण संपूर्ण गाव काळजीत आहे. कुटुंब, नातेवाइकानी त्यांचा शोध घेतला पण त्या कुठेच आढळून येत नाहीत. कवठे गावाच्या जवळ आणि शेताजवळ असलेल्या सर्व विहिरी पडताळण्यात आल्या. पाहुण्यांकडे चौकशी केली. परिसरातील गावे धुंडाळली पण तरीही जैतुनबी शेख यांचा कसलाच पत्ता लागत नाही की त्यांच्याबाबत कसलीही माहिती उपलब्ध होत नाही. सोशल मीडियावरून देखील याची माहिती आणि फोटो देण्यात आले तरीही काहीच धागेदोरे मिळून येत नाहीत. (Female sarpanch of Solapur district has been missing for five days) शेताच्याच रस्त्यालगत असलेल्या एका पाऊलवाटेवर एक चप्पल दिसूल आली त्यामुळे गावकऱ्यांनी जवळ असलेल्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले पण त्यांचा शोध लागलाच नाही.  


पोलिसांकडे खबर मिळाल्यापासून सलगर वस्ती पोलीस देखील शेख यांचा शोध घेत असून त्यानाही अद्याप काही ठावठिकाणा मिळाला नाही. ज्या शेतात जैतुनबी शेळ्या घेवून गेल्या होत्या त्या शेतात जाऊन पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. गावातील नागरिकांकडे देखील पोलिसांनी सर्व बाजूने तपास केला. शेतात सापडलेल्या चप्पलच्या आधाराने श्वानपथकाकडून देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला पण हे श्वान शेतातच काही अंतर गेल्यावर जागेवरच घुटमळत राहिले त्यामुळे त्या पर्यायाने देखील भाभीचा शोध लागू शकला नाही. पोलिसांनी कुटुंबाकडेही विचारपूस केली शिवाय गावात राजकीय व्यक्तींसोबत काही वाद झाला होता काय ? याची देखील माहिती पोलिसांनी घेतली पण त्यांच्याही हाती काही लागताना दिसत नाही. 


मोबाईल नव्हता त्यामुळे ---
बेपत्ता झालेल्या महिला सरपंच जैतुनबी शेख या मोबाईल वापरत नव्हत्या त्यामुळे शोध घेण्यात अडचण येताना दिसत आहे. मोबाईल वापरत असत्या तर त्यांचा ठावठिकाण शोधणे सोपे झाले असते. बेपत्ता होऊन पाच दिवस झाले पण कसलेही धागेदोरे मिळत नाहीत. शेतात सापडलेली चप्पल मात्र त्यांचीच असल्याचे शेख यांच्या मुलाने सांगितले आहे. पाच दिवस होऊनही जैतुनबी यांचा तपास लागत नसल्याने संपर्ण गाव अस्वस्थ आणि चिंतातूर बनले आहे.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !