BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ सप्टें, २०२२

पत्नीनेच काढला पतीचा 'काटा' ! आरोपीसह पुरावेही मिळाले !

 



शोध न्यूज : रात्री घरातून जाऊन एका तरूणाचा खून झाल्याने खळबळ उडाली असतानाच पत्नीनेच कारस्थान रचून आपल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली असून पोलिसांनी आरोपीसह महत्वाचे पुरावेही हस्तगत केले आहेत. 


सोलापुरात काल मध्यरात्री जुन्या विडी घरकुल परिसरात गंगाई केकडेनगर येथे राहणाऱ्या दशरथ नागनाथ नारायणकर याचा गळा चिरून अज्ञात आरोपींनी खून केला होता. पहाटेच्या दरम्यान दशरथ याला कुणीतरी उठवले आणि बाहेर बोलावले. झोपेतून उठून दशरथ गेला होता. त्यानंतर  त्याची पत्नी अरुणा उठून बाहेर आली असता दशरथ रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आले. दशरथ नारायणकर या तरुणाचा गळा चिरून त्याचा खून केल्याचे त्याच्या पत्नीला दिसले आणि तिने आरडाओरडा सुरु केला.  अरुणा हिने घरात शिरलेल्या एका व्यक्तीचा हात पकडला पण तिच्या हाताला चावा घेवून आरोपी पळून गेला अशा प्रकारची फिर्याद दशरथची पत्नी अरुणा हिने पोलिसात दिली. 


दशरथ याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेचा पंचनामा केला. घरातून झोपेतून उठवून खून केल्याच्या या प्रकाराने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि हा खून कुणी आणि कशासाठी केला असेल याच प्रश्न ज्याला त्याला पडलेला होता. पोलिसांनी देखील तातडीने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पत्नी अरुणा ही तर आपल्या पतीचा खून झाल्यामुळे एकसारखी रडत होती. पण याच अरुणा नावाच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच नवऱ्याचा काटा काढला असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी अत्यंत जलदगतीने या घटनेचा तपास लावला आणि पुरावे देखील त्यांच्या हाती आले. 


पोलिसांनी काही गुप्त माहिती जमा केली आणि त्यांचा तपास मयत दशरथच्या पत्नीकडे वळला. अरुणा हिचे बाबासो जालिंदर बाळशंकर याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आणि तपास वेगाने पुढे सरकू लागला. जालिंदर हा सतत अरुणाला भेटत होता आणि घटनेच्या दिवशीही त्याला दशरथच्या घराच्या जवळपास काही लोकांनी पहिले होते. ही माहिती पोलिसांच्या हाती आली. पोलिसांनी बाबासो याच्या मोबाईलची माहिती घेत तपास केला असता त्याचा मोबाईल बंद आढळला. त्यामुळे पोलीसानाचा संशय आणखी बळावला. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा त्याच्याकडेच वळवली. दशरथ याचा खून झाला त्या रात्री बाबासो बाळशंकर हा आपल्या घरात नव्हता याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस अधिकच तपासाच्या जवळ पोहोचू लागले.


पोलिसांनी अखेर या बाबासो बाळशंकर यांच्या मुसक्या आवळल्या आणि चौकशी सुरु केली. पोलिसांनी आपल्या स्टाईलने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. मयत दशरथ याची पत्नी अरुणा नारायणकर हिच्याशी आपले सात आठ वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे देखील त्याने पोलिसांना सांगून टाकले. याच प्रेम संबंधातून अरुणाच्या संगनमताने आणि कट रचून दशरथ याचा खून केल्याची कबुली बाळशंकर याने दिली आणि खुनाचे रहस्य उघड झाले. (Solapur Crime) आरोपी बाबासो बाळशंकर याचा मोबाईल ताब्यात घेवून तपासला असता अरुणा हिने बाबासो याला पाठविलेले मेसेज आढळून आले. 


अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघांनी मिळून अरुणाच्या पतीला मारण्याचे कारस्थान रचले होते. यासाठी नियोजनबध्द कट रचण्यात आला होता. झोपेच्या गोळ्या, चाकू, नायलॉनची दोरी याचीही खरेदी करण्यात आली होती. अरुणा हिने मात्र पोलिसांना गुंगारा देण्याचे नाटक सूरच ठेवले होते. (Murder of husband with the help of lover) अरुणा आणि बाबासो बाळशंकर या दोघात झालेले व्हॉटस ऍप चॅटिंग मिळालेले असल्याची माहिती पोलिसांनी देताच अरुणा शांत झाली आणि तिने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून अत्यंत जलद गतीने या खुनाचे रहस्य उघड करण्यास पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.         

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !